‘कोरोना पास’ शिक्का बसलेल्यांसाठी राज्य सरकारचा मदतीचा हात
|उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
कोरोना काळात ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थी सहज पास झाले असले तरी त्या काळात शिक्षण प्रक्रिया विस्कळीत झाल्याने त्यांचे शिक्षण योग्य रितीने झाले नाही, अनेक विषयात ते मागे पडले आणि त्यांच्यावर ‘कोरोना पास’चा शिक्का बसला. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत एका विशेष योजनेची घोषणा विधिमंडळात केली.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये कोरोना कालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रिज कोर्स’ हा उपक्रम राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
चालू शैक्षणिक वर्षामधील पदवी व पदव्युत्तरच्या सर्व विषयांसाठी हा उपक्रम राबविण्यात येईल. कोरोना काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हा अतिरिक्त शैक्षणिक उपक्रम आहे व त्यामध्ये सहभागी व्हावे अथवा नाही हे ठरविण्याची विद्यार्थ्यांना मोकळीक असेल. या उपक्रमाची जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रत्येक विषय शिक्षकावर देण्यात आली आहे. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे.
कोरोना काळात शिक्षणात अडथळा आल्याने विद्यार्थ्यांना काही विषय समजत नाहीत. त्यामुळे त्यांना आकलन न झालेले घटक निश्चित करून गरजेप्रमाणे अध्यापन वर्ग आयोजित करण्यात येईल. प्रत्येक विषयाच्या आवश्यकतेनुसार किमान पाच तासिका आयोजित करायच्या आहेत. सेतू अध्ययन उपक्रमाचे वेळापत्रक महाविद्यालयांनी करून त्याची अंमलबजावणी करायची आहे. शक्यतो सत्र सुरू होतानाच विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून त्यांना मदत करणे अपेक्षित आहे. प्रथम सत्रात हा उपक्रम १५ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करायचा आहे तर दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर एक महिन्यात पूर्ण करता येईल.
या वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अपेक्षित पूर्वज्ञान झाले का, याची खातरजमा करण्यासाठी परीक्षा घेण्यात येईल. हा उपक्रम समाधानकारकरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
अभियांत्रिकी व औषधनिर्माण पदविका नापास विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून संधी
कोरोनामुळे विस्कळित झालेली शिक्षण प्रक्रिया ध्यानात घेता अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या यंदा 2022 च्या अंतिम परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थांसाठी एक विशेष बाब म्हणून सप्टेंबर, 2022 मध्ये फेर परीक्षा घेण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधिमंडळात केली.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टीने अपवादात्मक स्थितीत विद्यार्थ्यांना एक अधिकची संधी देण्याच्या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, अनुत्तीर्ण विध्यार्थ्यांना संबंधित विषयाचे योग्य आकलन व्हावे यासाठी संस्था स्तरावर मार्गदर्शन करणारे रेमेडिअल कोचिंग किंवा ब्रिज कोर्सेस घेण्याचे आदेशही सर्व संस्थांना देण्यात येतील.
राज्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या स्वायत्त मंडळाद्वारे आयोजित केल्या जातात. कोरोनाच्या महासाथीमुळे तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी परीक्षा २०२०, हिवाळी परीक्षा २०२०, उन्हाळी परीक्षा २०२१ व हिवाळी परीक्षा २०२१ या चार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या होत्या. त्यानंतर प्रथमच उन्हाळी २०२२ ही परीक्षा प्रचलित ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली व तिचा निकाल २९ जुलै रोजी जाहीर केला आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी यासाठी काही विद्यार्थी, संस्था आणि संघटनांची निवेदने तंत्रशिक्षण मंडळाकडे आली होती. या पार्श्वभूमीवर मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी निर्णय जाहीर केला.