वाढीव मिळकतकर बिलांसाठी कायदेशीर सल्ला घेणार
: भाजपच्या शिष्टमंडळाला महापालिका आयुक्तांचे आश्वासन
पुणेकरांना मिळकतकराची बिले ४० टक्के वाढील आकारण्यात आली आहेत. त्यामुळे मिळकतकर भरण्याची इच्छा असूनही वाढीव बिलांमुळे तो भरला जात नाही. याबाबत पुणेकरांच्या भावना तीव्र असल्याचे भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले असता याबाबत कायदेशीर सल्ला घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. ते म्हणाले, मिळकतकरात मुख्य सभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ४० सूट दिली जाते. परंतु २०१२ मध्ये लोकलेखा समितीने कायदेशीर आधार नसल्याने अशा प्रकारची सूट देता येणार नाही असे सांगितले. याबाबत मुख्य सभेने वारंवार ठराव करून सुट दिली. राज्य सरकारने त्यासाठी मंजुरी दिली. आता प्रकरण उच्च न्यायालयात आहे. या संदर्भात पुणेकरांना दिलासा देण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात येईल.
तसेच पावसाळ्या पूर्वीची कामे १५ जून पूर्वी करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज शहर भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, माजी आमदार योगेश टिळेकर, बापूसाहेब पठारे, सरचिटणीस गणेश घोष, दत्ता खाडे, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, माजी नगरसेवक योगेश मुळीक, सुशील मेंगडे, धनंजय जाधव, संदीप खर्डेकर, तुषार पाटील, शशिकांत कुलकर्णी यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
मुळीक म्हणाले, ‘पावसाळी गटारे आणि नाल्यांच्या साफसफार्इची कामे अपेक्षित वेगाने सुरू नाहीत. पाणी साठून पुरस्थिती निर्माण होणार्या ३२८ स्पॉटवर उपाययोजना झालेल्या नाहीत. रस्त्याची कामे झाल्यानंतर ड्रेनेजची झाकणे समपातळीवर आली नसल्याने, अपघात होत आहेत. धोकादायक वाडे आणि इमारतींबद्दल सुस्पष्ट धोरण नाही. सध्या नदीमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्याने डासांचा त्रास होत आहे. समाविष्ट गावांतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न, शहराच्या विविध भागांमध्ये कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आदी बाबींकडे आयुक्तांचे लक्ष वेधले.’
कुमार म्हणाले, ‘पावसाळी गटारे आणि नाल्यांच्या साफसफाईसाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, १५ जूनपूर्वी ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. आंबील ओढ्यातील सुरक्षिततेची कामे अंतिम टप्प्यात आहेत. शहरातील मॅनहोल समपातळीत आणण्याची कामे ३० मे पर्यंत पूर्ण केली जातील. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विविध ठिकाणी उपाययोजना सुरू आहेत. धोकादायक वाडे आणि इमारतींबाबत शहर अभियंतांच्या नेतृत्वाखालील पथक योग्य त्या उपाययोजना करीत आहेत. गेल्या वर्षी दररोज १३०० एमएलडी पाणी उचलले जायचे. पाण्याचा वापर वाढला आहे. आता दररोज १६०० एमएलडी पाणी लागते. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाक्या उभारण्याची कामे सुरू आहेत. या टाक्यांच्या चाचण्या सुरू आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.
COMMENTS