मनसे नेते अंजनेय साठे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अंजनेय साठे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथे टिळक भवनात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या युवा नेत्याचे स्वागत नाना पटोले यांनी पुष्पगुच्छ आणि काँग्रेसचे तिरंगी उपरणे देऊन केले. याप्रसंगी विधिमंडळ पक्षेनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहप्रभारी सोनल पटेल, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे आदी उपस्थित होते.
समाजकारण, राजकारण या क्षेत्रात कार्यरत असणारे अंजनेय साठे यांनी काँग्रेसच्या विचारधारेशी बांधिलकी मानली. त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत असे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.
अंजनेय साठे यांचे वडील डॉ. सुनील साठे आणि आई डॉ. अर्चना साठे हे दोघेही सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत. अंजनेय साठे यांचे पणजोबा स्वर्गीय विनायकराव साठे हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सात वर्षे तुरुंगवास भोगला होता. कै.विनायकराव साठे यांनी तत्कालीन सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री पद भूषविले होते.
COMMENTS