Pune Municipal Corporation | पुण्यात २२ नोव्हेंबरला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; ३ लाख १६ हजार बालकांना दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट
महापालिका क्षेत्रात १,३६७ लसीकरण बूथ उभारणार; सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण
Pune Polio Vaccination – The Karbhari News Service – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ३ लाख १६ हजार २७५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी शहरात एकूण १ हजार ३६७ लसीकरण बूथ उभारण्यात येणार आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत या केंद्रांवर बालकांना लस देण्यात येणार आहे. (Pune PMC Health Department)
महापालिकेच्या आरोग्य विभागाने या मोहिमेची तयारी सुरू केली असून, शहरातील सर्व पात्र बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या घरातील तसेच परिसरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला जवळच्या लसीकरण केंद्रावर आणून पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी केले आहे.
नियमित लसीकरण झाले असले तरी दोन थेंब आवश्यक
विशेष म्हणजे, ज्या बालकांनी यापूर्वी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत पोलिओचे डोस घेतले आहेत, अशा बालकांनाही या विशेष मोहिमेदरम्यान पोलिओचे दोन थेंब देणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी भेट देणाऱ्या पथकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पोलिओमुळे कायमस्वरूपी अपंगत्वाचा धोका
पोलिओ हा विषाणूमुळे होणारा गंभीर संसर्गजन्य आजार आहे. प्रामुख्याने पाच वर्षांखालील बालकांना या आजाराचा धोका अधिक असतो. पोलिओची लागण झाल्यास बालकांच्या हात-पायांना पक्षाघात होऊन कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते. काही गंभीर प्रकरणांमध्ये श्वसनक्रियेवरही परिणाम होऊन जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. पोलिओवर विशिष्ट उपचार उपलब्ध नसल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण हाच सर्वात प्रभावी उपाय आहे.
पोलिओमुक्त भारताचे ध्येय कायम राखण्यासाठी सहभाग आवश्यक
जगातील काही देशांमध्ये अद्याप पोलिओ विषाणूचे अस्तित्व असल्याने भारतातील पोलिओमुक्त स्थिती कायम राखण्यासाठी प्रत्येक लसीकरण मोहिमेला महत्त्व आहे. प्रत्येक पात्र बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब मिळणे आवश्यक आहे. पोलिओमुक्त भारताचे ध्येय कायम राखणे ही केवळ आरोग्य विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे.
त्यामुळे पुणे शहरातील सर्व पालक आणि नागरिकांनी २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. नीना बोराडे यांनी केले आहे.
“दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दर वेळी” या संदेशातून महापालिकेने नागरिकांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS