PMC Road Quality SOP | खोदकामानंतर चर नीट न बुजवल्यास कंत्राटदार, अभियंते जबाबदार!
| ७५ किमी सायकल मार्गाचे जाळे, ग्रँड टूरपूर्वी रस्ते-पदपथ सुधारणांना वेग
Pune PMC News – The Karbhari News Service – शहरात विविध सेवावाहिन्यांसाठी वारंवार खोदकाम होते, मात्र चर नीट न बुजवल्याने चांगले रस्तेही खराब होतात. याबाबत पुणे महानगरपालिका आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, युटिलिटी चर पुनर्भरण व मॅनहोल कामांसाठीच्या प्रमाणित कार्यपद्धतीची (SOP) काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. निकृष्ट कामासाठी कंत्राटदार तसेच देखरेख करणाऱ्या मनपा अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही देण्यात आले. मनपाच्या मुख्य भवनात १९ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकीनंतर पथ विभागाचे मुख्य अभियंता यांनी ही माहिती प्रसिद्धीस दिली.
पुणे ग्रँड टूर २०२७ : केवळ डांबरीकरण नव्हे, संपूर्ण सुशोभीकरण
या बैठकीत पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत प्रस्तावित रस्ते सुधारणा कामकाज व समन्वय, पदपथ विकास, सायकल मार्गांचे जाळे आणि शहरातील विविध युटिलिटी सेवांसाठी खोदलेल्या चरांचे पुनर्भरण व मॅनहोलची कामे यावर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तज्ज्ञ सल्लागारांनी सविस्तर सादरीकरण केले.
महापालिका आयुक्तांनी केवळ रस्त्यांचे डांबरीकरण किंवा पुनर्पृष्ठीकरण इतक्यापुरती कामे मर्यादित न ठेवता, पदपथांची स्थिती, पादचाऱ्यांची सुरक्षितता, चौक सुधारणा, स्वच्छता आणि रस्त्यांचे एकूण सुशोभीकरण यांचा समावेश करण्याचे निर्देश दिले. ग्रँड टूर मार्गावरील आवश्यक पदपथ दुरुस्तीची कामे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना करावीत, यासाठी पथ विभागाच्या पदपथ विकासकामांच्या तरतुदींचा आवश्यकतेनुसार वापर करण्याबाबतही चर्चा झाली.
चौक सुधारणा, प्लेसमेकिंग आणि CSR सहभाग
नागरी रचना तज्ज्ञ श्री. आशक जैन यांनी सादर केलेल्या चौक सुधारणा, प्लेसमेकिंग व सुशोभीकरणाच्या प्रस्तावांचाही आढावा घेण्यात आला. या कामांमध्ये संबंधित मार्गालगतच्या बांधकाम व्यावसायिकांचा आणि आस्थापनांचा सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (CSR) माध्यमातून सहभाग घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
युटिलिटी चर पुनर्भरण व मॅनहोलसाठी SOP
श्री. विकास ठकार यांनी पुणे शहरातील रस्ते युटिलिटी चरांचे पुनर्भरण आणि मॅनहोल समपातळीकरणाच्या कामांसाठी तयार केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीवर (SOP) सविस्तर तांत्रिक सादरीकरण केले. पुणे ग्रँड टूर २०२६ अंतर्गत या कार्यपद्धतीनुसार केलेल्या कामांची उदाहरणे, तसेच या रस्त्यांनी पावसाळ्यात दाखवलेली समाधानकारक कामगिरी याबाबत माहिती देण्यात आली.
शहरात विविध सेवावाहिन्यांसाठी रस्त्यावर वारंवार खोदकाम केले जाते. मात्र खोदलेले चर योग्य पद्धतीने न बुजवणे, निकृष्ट पुनर्भरण, मॅनहोलची अयोग्य पातळी तसेच संबंधित अभियंते व कंत्राटदारांकडून प्रभावी देखरेखीचा अभाव यामुळे चांगल्या स्थितीतील रस्त्यांवरही खड्डे पडतात आणि रस्त्यांचे नुकसान होते. यावर आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पुढील निर्देश दिले :
SOP ची प्रभावी अंमलबजावणी : पथ विभाग, क्षेत्रीय कार्यालये, विविध सेवावाहिनी विभाग व संबंधित कंत्राटदारांनी चर पुनर्भरण व मॅनहोल कामांसाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करावे. यासाठी ड्रेनेज, पाणीपुरवठा व क्षेत्रीय कार्यालय यांसारख्या सर्व संबंधित विभागांचे प्रशिक्षण आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले.
निकृष्ट कामासाठी जबाबदारी निश्चित : युटिलिटी चर किंवा मॅनहोलची कामे अल्पावधीत निकामी झाल्यास संबंधित कंत्राटदार तसेच कामावर देखरेख करणाऱ्या मनपा अभियंत्यांची जबाबदारी विभागप्रमुखांनी निश्चित करावी. यासाठी शहरात यापूर्वी केलेल्या आणि नंतर खराब झालेल्या चर व मॅनहोल कामांची ठिकाणनिहाय तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल आयुक्तांना सादर करावा.
देखरेख वाढवणे : पथ विभाग, क्षेत्रीय कार्यालये व संबंधित सेवावाहिनी विभागांनी कामाच्या अंमलबजावणीदरम्यान गुणवत्ता नियंत्रण व नियमित देखरेख सुनिश्चित करावी.
अभियंते व कंत्राटदारांचे प्रशिक्षण : कनिष्ठ अभियंते, पर्यवेक्षक व कंत्राटदारांसाठी नियमित तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत.
रस्त्यांचे वारंवार खोदकाम आणि अयोग्य पुनर्भरणामुळे रस्त्यांचे अकाली नुकसान, खर्चात वाढ, नागरिकांची गैरसोय आणि सार्वजनिक निधीचा अनावश्यक खर्च होतो, त्यामुळे कामांचा दर्जा, प्रभावी देखरेख व संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यावर भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
शहरात ७५ किमी लांबीचे सलग सायकल मार्गांचे जाळे
इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (ITDP) संस्थेमार्फत पुणे शहरातील प्रस्तावित ७५ किमी सायकल मार्गांबाबत सादरीकरण करण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेल्या सायकल मार्गांमधील तुटक जोडणी, अपूर्ण टप्पे तसेच काही ठिकाणी आवश्यक दुरुस्ती व सुधारणा याबाबत चर्चा झाली. आयुक्तांनी अस्तित्वातील सायकल मार्गांची आवश्यक दुरुस्ती करून अपूर्ण जोडणी पूर्ण करण्याचे आणि ७५ किमी लांबीचे सलग, सुरक्षित व वापरण्यायोग्य सायकल मार्गांचे जाळे विकसित करण्याचे निर्देश पथ विभागाला दिले. ही कामे पुणे ग्रँड टूर २०२७ च्या विकासकामांशी समन्वय साधून केली जातील.
फक्त स्पर्धेपुरते नाही, पुणेकरांसाठी दीर्घकालीन लाभ
रस्त्यांचा दर्जा सुधारणे, विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय वाढवणे, कामे निश्चित मुदतीत पूर्ण करणे आणि गुणवत्तेबाबत संबंधितांची जबाबदारी निश्चित करणे यावर दोन्ही बैठकांमध्ये विशेष भर देण्यात आला. पुणे ग्रँड टूर २०२७ च्या निमित्ताने हाती घेतल्या जाणाऱ्या रस्ते विकासकामांचा लाभ केवळ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेपुरता मर्यादित न राहता पुणेकरांना दीर्घकाळ मिळावा, यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

COMMENTS