CM on Pune Election | पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या सूचना!
| डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी लोकप्रतिनिधींची बैठक; मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यावर भर
Pune News – The Karbhari News Service – पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीने प्रचाराची तयारी वेगाने सुरू केली आहे. या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी झोकून देऊन काम करावे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. (CM Devendra Fadnavis)
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि अन्य लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत प्रचारासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.
मागील पराभवातून धडा; पुन्हा वर्चस्व मिळवण्याची संधी
पुणे पदवीधर मतदारसंघातून यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नेतृत्व केले आहे. मात्र, मागील निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. यंदा या मतदारसंघात पुन्हा वर्चस्व मिळवण्याची संधी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत नमूद केले.
पुण्यात भाजपची मोठी संघटनात्मक ताकद असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेल्या यशाचाही त्यांनी संदर्भ दिला. मात्र, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असल्याने या निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केवळ प्रचार नव्हे, मतदारांना केंद्रापर्यंत आणण्याचे आव्हान
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांशी थेट संपर्क साधण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी मतदारांशी संवाद साधावा, त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून द्यावे आणि मतदानाच्या दिवशी ते केंद्रापर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या.
पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या कामकाजाचाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
भाजप-महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे उपस्थित होते.
याशिवाय भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष शत्रुघ्न काटे, पुणे ग्रामीणचे अध्यक्ष शेखर वडणे, पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे, निवडणूक प्रभारी डॉ. प्रशेम कोल्हे, प्रदेश सचिव शरद लाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ऊर्फ भय्या माने यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक उपस्थित होते.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी संघटनात्मक ताकदीसोबतच मतदारांशी थेट संपर्क आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर भाजप-महायुतीचा भर असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

COMMENTS