Prmaod Nana Bhangire on PMC JE Exam | पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घ्या — प्रमोद नाना भानगिरे
| विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा
PMC JE Bharti – (The Karbhair News Service) – पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका फुटल्याचे महापालिका प्रशासनाने मान्य केले असून, विद्यार्थ्यांनी याबाबतचे पुरावे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तीन उमेदवारांवर कारवाई करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घेण्यात यावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवावा, अशी मागणी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे. “तीन उमेदवारांवर कारवाई झाली म्हणजे हा गैरप्रकार केवळ तीन उमेदवारांपुरताच मर्यादित होता, असे कसे मानता येईल? प्रश्नपत्रिका आणखी किती उमेदवारांपर्यंत पोहोचली आणि त्याचा लाभ किती जणांनी घेतला, याची सखोल चौकशी झाली आहे का? अशा परिस्थितीत त्याच परीक्षेच्या निकालावर नियुक्त्या करणे योग्य आहे का?” असा सवाल भानगिरे यांनी उपस्थित केला. (PMC JE Recruitment)
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी २२, २३ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी टीसीएस आयऑन केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर ९ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, १६ जून रोजी काही विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिका फुटल्याचे पुरावे उपलब्ध झाले. संबंधित विद्यार्थ्यांनी हे पुरावे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. परीक्षा सुरू असताना प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते बाहेर पाठविणे आणि त्याचा गैरफायदा घेण्यात आल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकरणी तीन उमेदवारांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हेदेखील दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी गैरप्रकार उघडकीस आणून त्याचे पुरावे प्रशासनाला दिले. त्या पुराव्यांच्या आधारे तीन उमेदवारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मग प्रश्न असा आहे की, प्रश्नपत्रिका फुटली असेल तर ती केवळ याच तीन उमेदवारांपर्यंत पोहोचली होती, हे प्रशासनाने कशाच्या आधारे निश्चित केले? प्रश्नपत्रिकेचे फोटो बाहेर पाठविल्यानंतर ते कोणाकोणापर्यंत पोहोचले? मोबाईलच्या माध्यमातून त्याचा लाभ घेणाऱ्या इतर उमेदवारांचा शोध घेण्यात आला का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे अत्यंत आवश्यक आहे.”
“तीन उमेदवारांवर कारवाई झाली असली तरी या गैरप्रकाराची व्याप्ती त्यापेक्षा मोठी असण्याची दाट शक्यता आहे. हजारो विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन परीक्षा दिली आहे. पेपरफुटीचा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण परीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे याच निकालाच्या आधारे इतर उमेदवारांना नियुक्त्या देणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या हक्कावर अन्याय करण्यासारखे आहे. नियुक्त्या तात्काळ थांबवून संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करावी आणि सर्व विद्यार्थ्यांना समान व निष्पक्ष संधी देण्यासाठी फेरपरीक्षा घ्यावी,” अशी मागणी भानगिरे यांनी केली.
या प्रकरणात पुणे महानगरपालिका प्रशासनातील काही बड्या व्यक्तींच्या सहभागाबाबत शिवसेना पुणे शहराकडे खात्रीदायक माहिती उपलब्ध असल्याचेही प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले. “या प्रकरणाची संपूर्ण साखळी समोर आली पाहिजे. प्रश्नपत्रिका बाहेर कशी गेली, ती कोणाकडे पोहोचली आणि त्याचा लाभ कोणाकोणाने घेतला, याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. प्रशासनातील बडे मासे यामध्ये सहभागी असल्याची खात्रीदायक माहिती आमच्याकडे आहे. या संदर्भातील पुरावे योग्य वेळी जनतेसमोर आणले जातील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा इशारा भानगिरे यांनी दिला.
“महापालिका प्रशासनाने तातडीने कनिष्ठ अभियंता पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षेचा निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांना पारदर्शक, समान आणि निष्पक्ष संधी मिळाली पाहिजे. दोषी कोणत्याही स्तरावरील असो, त्याची चौकशी करून कठोर कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेतला नाही, तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी पुणे महानगरपालिकेत तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,” असे प्रमोद नाना भानगिरे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS