PMC Scholarship Schemes | पुणे महापालिकेच्या दोन शैक्षणिक अर्थसहाय्य योजनांसाठी अर्ज सुरू | 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना घेता येणार लाभ
| 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार
PMC SDD – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या आणि सन 2026 मध्ये 10 वी तसेच 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाने दोन शैक्षणिक अर्थसहाय्य योजना जाहीर केल्या आहेत. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना आणि लोकशाहिर अण्णाभाऊ साठे योजना या दोन्ही योजनांसाठी 10 वी आणि 12 वी साठी स्वतंत्रपणे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
समाज विकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीप्रमाणे अर्ज भरण्याची सुविधा 10 ऑगस्ट 2026 सकाळी 10.00 वाजल्यापासून सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थी 31 डिसेंबर 2026 सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत http://dbt.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
कोणत्या दोन योजना आणि पात्रता काय
दोन्ही योजनांमध्ये 10 वी आणि 12 वी साठी स्वतंत्र अर्थसहाय्य आहे.
1. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना
पात्रता: खुल्या गटातील विद्यार्थी. सन 2026 च्या 10 वी किंवा 12 वी परीक्षेत किमान 80% गुण आवश्यक.
2. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना
पात्रता:
– महापालिका शाळा/राज्यशासन/महानगरपालिका अनुदानित शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थी – किमान 70% गुण
– 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना – किमान 45% गुण
– कचरा वेचक, बांधकाम कामगार आणि असंघटित कामगारांच्या मुलांना – किमान 65% गुण
शैक्षणिक वर्षासाठी 10 वी साठी 15 हजार रुपये आणि 12 वी साठी 25 हजार रुपये एकरकमी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. एका कुटुंबातील एकाच विद्यार्थ्याला एकाच योजनेचा लाभ मिळेल.
*अर्ज कसा करायचा आणि महत्त्वाच्या सूचना*
1. अर्ज फक्त ऑनलाइन http://dbt.pmc.gov.in वर पालकांच्या नावाने भरावा लागेल.
2. मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे.
3. महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा हमीपत्र संकेतस्थळावरून डाउनलोड करून भरून अपलोड करावे लागेल.
4. लाभार्थ्याचे आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खाते असणे आवश्यक आहे.
5. अर्ज Submit केल्यानंतरच तो ग्राह्य धरला जाईल. फक्त Save as Draft केल्यास अर्जाचा विचार होणार नाही.
6. अर्जात त्रुटी आढळल्यास दिलेल्या मुदतीत दुरुस्ती करणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज रद्द होईल.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरुवात: 10 ऑगस्ट 2026, सकाळी 10.00 वाजता
अर्जाची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2026, सायंकाळी 5.30 वाजता
म्हणजे अर्जासाठी सुमारे 4 महिने आणि 21 दिवसांचा कालावधी आहे.
अधिक माहितीसाठी पुणे महापालिकेच्या संबंधित क्षेत्रिय कार्यालयातील समाज विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच टोल फ्री क्रमांक 18008330223 वरही माहिती मिळेल.

COMMENTS