PMC Election Voting | निवडणूकीत मतदानाची टक्केवारी ९०% पेक्षा जास्त होण्यासाठी जनजागृती करा | महापालिका आयुक्तांच्या प्रशासनाला सूचना
PMC Election 2025-26 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी ९०% पेक्षा जास्त होण्यासाठी निवडणूक आयोगाकडील सूचनानुसार विविध प्रसार माध्यमांद्वारे जनजागृती मोहिम राबविण्यात यावी. तसेच १००% मतदार स्लीपस वाटपाचे बी.एल.ओ. कडुन कामकाज योग्य पध्दतीने करण्याचे नियोजन करण्यात यावे. अशा सूचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक प्रकिया सुरळीत पार पाडण्यासाठी अत्यावश्यक असलेले कामकाज पुर्ण करण्याचे दृष्टिने त्यांचे अधिनस्त असलेले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व विविध कक्षाचे कक्ष प्रमुख यांचेशी समन्वय साधणेबाबत सूचना देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन त्यानुषंगाने आज दुपारी १२.०० वा. मा. महापालिका आयुक्त, तथा शहर निवडणूक अधिकारी, पुणे महानगरपालिका यांचे अध्यक्षतेखाली अति. महापालिका आयुक्त (विशेष), पुणे महानगरपालिका उपआयुक्त (निवडणूक), पुणे महानगरपालिका आणि निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (क्र. १ ते ३) तसेच निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेले विविध कक्षाचे कक्ष प्रमुख यांचे समवेत बैठक घेण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही व कायद्याचे काटेकोरपणे पालन होईल याची पुरेपूर दक्षता सर्व संबंधित अधिकारी यांनी घेणे बाबत सूचना देण्यात आल्या. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करावी, गुन्हे दाखल करावेत. अशा सूचना करण्यात आल्या.
पुणे शहरातील अनधिकृत फलक, बॅनर्स, पोस्टर्स तसेच, अतिक्रमण असल्यास, त्यावर त्वरित कारवाई करणे, शहर स्वच्छ व नीटनेटके ठेवणे बाबत सूचना देण्यात आल्या.
मा. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मागदर्शक सूचनेनुसार मतदान केंद्राची करावीत मतदान केंद्रावरील सोयी सुविधा, तसेच दिव्यांगासाठी, महिला, जेष्ठ नागरिक यांना मतदान करणे सोपे होण्याच्या दृष्टिने मतदान केंद्र स्थापना प्राधान्याने तळमजल्यावर करावीत. असे आदेश देण्यात आले.
निवडणूक कामकाजाशी संबंधित असणारी माहिती आणि नमुने उमेदवाराना उपलब्ध करून देणेबाबत सूचना देण्यात आली. २३ डिसेंबर २०२५ पासुन छापील नामनिर्देशन पत्र वितरण व स्विकारण्याची कार्यवाही सुरू होणार असुन, त्याअनुषंगाने दि.२० डिसेंबर २०२५ पर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय तात्काळ कार्यान्वित करण्यात यावीत. तसेच निवडणूक कामकाजासाठी लागणारी अत्यावश्यक स्टेशनरी व इतर साधनसामुग्री उपलब्ध करून देणेबाबत सूचना देण्यात आली.
मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिध्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुबार मतदारांच्या नावा बाबत आयोगाच्या आदेशाप्रमाणे काळाजीपूर्वक ओळख पटवणे आवश्यक राहील. मतदान केंद्रांवर काम करणा-या केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी या पथकाना प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर आयोजित करून प्रशिक्षण कक्ष प्रमुख यांचेशी सल्लामसलत करून वेळापत्रक निश्चितीबाबत आणि मास्टर ट्रेनर्स उपलब्ध करून देणेबाबत सूचना देण्यात आली.
निवडणूक खर्च कक्षाकडुन उमेदवारांचा दैनंदिन खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनसार कार्यवाही करण्यात यावी. उमेदवारांना आवश्यक असलेल्या थकबाकी नसल्याच्या प्रमाणपत्रासाठी एक खिडकी कक्ष (Single Window cell) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असुन, सदर कार्यप्रणाली अंतर्गत मनपाच्या २२ विभागांच्या वतीने अंतिम ना-हरकत दाखला ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. तसेच या सर्व गोष्टी उमेदवार यांना समजणे करिता, सहाय्य करणे करिता operator ची नियुक्ती प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात केली असल्याची माहिती देण्यात आली. याबाबत उमेदवारांना Online अर्ज करण्याबत आवाहन करण्याचे निर्देश देण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया ही संवेदनशील बाब असल्याने कोणतीही समस्या असल्यास त्याबाबत शहर निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे तात्काळ निदर्शनास आणून देणेबाबत उपस्थितांना सूचना देण्यात येऊन सुरळीपणे निवडणूक पार पाडण्याचे आदेश देण्यात आले.

COMMENTS