PMC Road Department | गेल्या ३० दिवसात खड्डे दुरुस्ती चे आतापर्यत सर्वात वेगात काम! | महापालिका पथ विभागाने स्वतःची थोपटली पाठ!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – शहरातील रस्त्यांवरील खड्डेमुक्ती मोहिमेला एक महिना पूर्ण झाला आहे. गेल्या ३० दिवसांत महापालिकेने रस्त्यांवरील तातडीच्या दुरुस्तीचे काम सर्वाधिक वेगाने केल्याचा दावा पथ विभागाने केला आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. पथ विभागाने अशी स्वतःची पाठ थोपटली असली तरी खरेच काम झाले का हे मात्र नागरिक ठरवणार आहेत. (Pune Potholes)
पावसकर यांच्या माहितीनुसार, शहरातील विविध रस्त्यांवर एकूण २,९८९ वेगवेगळे (आयसोलेटेड) खड्डे बुजवण्यात आले. हे असे खड्डे होते की, रस्ता एकूण चांगल्या स्थितीत असूनही काही ठिकाणी खोल किंवा धोकादायक खड्डे निर्माण झाले होते. अशा ठिकाणांना प्राधान्य देत तत्काळ दुरुस्ती करण्यात आली. मात्र काही रस्त्यांवर सलगपणे मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने केवळ खड्डे बुजवून समाधान होत नव्हते. अशा ठिकाणी संपूर्ण रस्त्याचे मिलिंग करून नव्याने डांबरीकरण करण्याची आवश्यकता असल्याने त्या मार्गानेही काम करण्यात आले.
महापालिकेने गेल्या महिन्यात एकूण १ लाख ८८ हजार ९४८ चौरस मीटर म्हणजे जवळपास १ लाख ८९ हजार चौरस मीटर रस्त्यांवर दुरुस्तीची कामे केली. हे क्षेत्रफळ अंदाजे १८ हेक्टर इतके आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम इतक्या कमी वेळेत यापूर्वी कधीच झाले नव्हते, असे पावसकर यांनी स्पष्ट केले. महापालिकेकडे प्रत्येक खड्ड्याचे ‘बिफोर-आफ्टर’ फोटो, कामाचा तपशील, मोजमाप यासह संपूर्ण नोंद उपलब्ध आहे. असे पथ विभागाने सांगितले आहे.
रोड मित्र ॲपच्या माध्यमातून नागरिकांकडून मिळालेल्या ३९०४ तक्रारींपैकी केवळ ३४ तक्रारी प्रलंबित राहिल्या असून बाकी सर्व तक्रारींवर कारवाई झाल्याचे पथविभागाने सांगितले. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून ॲपवर नोंद न झालेल्या खड्ड्यांचीही दुरुस्ती करण्यात आली.
या संपूर्ण मोहिमेस साधारण १५ कोटी रुपये खर्च आल्याचेही पावसकर यांनी सांगितले. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सरासरी प्रत्येकी एक कोटी रुपये या कामांसाठी वितरित करण्यात आले. त्याशिवाय, सुमारे १८०० ठिकाणी रस्ते खरवडून (मिलिंग) नव्याने थर टाकण्याचे काम करण्यात आले.
याचदरम्यान, महापालिकेने खड्डेमुक्तीच्या कामात निष्काळजीपणा आढळलेल्या काही ठेकेदारांवर कारवाईही केली असून महाप्रीत या संस्थेसह पोलिसांच्या ठेकेदारालाही ‘स्टॉप वर्क’ आदेश देण्यात आले आहेत.
—–

COMMENTS