PMC Transgender Employees | महापालिकेच्या तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांच्या निवासी धोरणाला महापालिका आयुक्तांची तत्वत: मान्यता | मोफत दिली जाणार घरे
PMC Security Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत नोकरी करणाऱ्या तृतीयपंथी कर्मचाऱ्यांच्या घरांचा मार्ग मोकळा झाला आहे. तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांच्या निवासी धोरणाला महापालिका आयुक्तांनी तत्वत: मान्यता दिली आहे. लवकरच यावर अंमल करण्यात येणार असून सेवकांना ही घरे मोफत दिली जाणार आहेत. अशी माहिती सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महापालिकेत २५ तृतीयपंथी कामावर घेण्यात आले आहेत. त्यांना सुरक्षा संबंधित कामे देण्यात आली आहेत. दरम्यान या सेवकांच्या राहण्याचा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. कारण शहरात या तृतीयपंथी लोकांना घरे भाड्याने दिली जात नाहीत. त्यामुळे सुरक्षा विभागाने मागणी केली होती की महापालिकेच्या वसाहतीत या कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय केली जावी. त्यानुसार एक निवासी धोरण करण्याची मागणी सुरक्षा विभागाने केली होती. सुरक्षा विभागाच्या विविध प्रश्नाबाबत महापालिका आयुक्तांनी आज बैठक घेतली. त्यात या धोरणाला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.
शहरातील विविध भागात जसे की, बाणेर, साने गुरुजी नगर, पीएमसी कॉलनी, महापालिकेच्या वसाहती आहेत. या वसाहती महापालिका कायम कर्मचाऱ्यांना भाडे तत्वावर दिल्या जातात. मात्र या वसाहती जीर्ण झाल्या आहेत. तसेच याचे भाडे जास्त आहे म्हणून कर्मचारी घरे माघारी करत आहेत. त्यामुळे ही घरे पडून आहेत. ही घरे आता या तृतीयपंथी सेवकांना दिली जाणार आहेत. त्यांच्याकडून भाडे घेतले जाणार नाही. मात्र वसाहतीची सुरक्षा या तृतीयपंथी सेवकांनी करायची आहे. असे विटकर यांनी सांगितले.

COMMENTS