Ashish Shelar on Pune Ganeshotsav | गणेशोत्सवात ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंचा वापर आदी विषयावर गणेश मंडळांनी देखावे सादर करावेत | सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

HomeBreaking News

Ashish Shelar on Pune Ganeshotsav | गणेशोत्सवात ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंचा वापर आदी विषयावर गणेश मंडळांनी देखावे सादर करावेत | सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

Ganesh Kumar Mule Aug 20, 2025 5:07 PM

Irshalwadi Children | चंद्रकांतदादा पाटील यांची ईर्शाळवाडीच्या मुलांसोबत दिवाळी साजरी
Chhatrapati Sambhaji Maharaj National Award | मनीषा पाटील यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार
Unseasonal Rain in Maharashtra | 27-28 डिसेंबरदरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Ashish Shelar on Pune Ganeshotsav | गणेशोत्सवात ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंचा वापर आदी विषयावर गणेश मंडळांनी देखावे सादर करावेत | सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

 

Pune Ganeshotsav 2025 – (The Karbhari News Service) – राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा राज्यशासनाने निर्णय घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. यावर्षीच्या गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग, ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंचा वापर, युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीतील १२ गडकिल्ले, पर्यावरण आदी विषयावर जनजागृती करण्याकरिता प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. (Pune News)

गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ॲड. शेलार म्हणाले, यंदाच्या गणेशोत्सवात ७ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देण्यात आली असून याबाबत प्रशासनाने गणेश मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यावा. प्रसिद्ध गणेश मंडळे, गणेश मंदीराचे भक्तांकरिता थेट प्रक्षेपणाद्वारे घरातूनच दर्शनाची सोय उपलब्ध करुन द्यावी, केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचा बँड शो आणि पोलीस दलांचा बँड शो तसेच डॉग शोचे आयोजन करावे. शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनांचे विद्यार्थी, सामाजिक संस्थांना सहभागी करुन उपक्रमाचे आयोजन करावे. महावितरणने गणेश मंडळांना वीज उपलब्ध करुन द्यावी. आरती करणाऱ्या भजनी मंडळाना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार असून याबाबतच्या संकेतस्थळाचे उद्या लोकार्पण करण्यात येणार आहे, याचा मंडळांना लाभ देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी,

गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून शासकीय आस्थापनाच्या इमारती, वारसास्थळांवर या बोधचिन्हाची रोषणाई करण्यासोबत महत्त्वाच्या चौकाचे सुशोभीकरण करुन रोषणाई करावी. विसर्जनाबाबत निर्गमित मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. विसर्जन मार्गावर ड्रोन शोचे आयेाजन, जाहिरात फलकांवर सामाजिक संदेश देण्याची कार्यवाही करावी. विदेशी विद्यार्थी, नागरिक, विदेश दुतावासातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे. भारतीय हवामान विभागाकडून पावसाबाबत देण्यात येणाऱ्या अंदाजानुसार प्रशासनाने तयारी करावी.

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना सन्मान झाला पाहिजे, अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणावे. विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करण्याबाबत तालुका आणि जिल्हास्तरावर विविध स्पर्धां आयोजित कराव्यात. मराठी संस्कृती, कलाकार, पंरपरांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात यावा. विविध विषयांबाबत व्याख्यानमाला, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करावे. समाजमाध्यमाद्वारे व्यापक स्वरुपात प्रसार आणि प्रचार करावा.

 

यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करुन त्यांच्या कर्तृत्वावर आधारित माहिती फलक लावावेत. मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन ॲड शेलार यांनी यांनी केले.

यावेळी आमदार श्री. शिरोळे आणि श्री. रासने यांनी गणेशोत्सव आयोजनाबाबत सूचना केल्या.

यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या तयारी, सोई-सुविधांबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: