Bhimashankar | राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना
DCM Eknath Shinde – (The Karbhari News Service) – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे, राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे. चांगले पीक येऊ दे; राज्यातील सर्व जनतेच्या जीवनात सुख, समाधान, आनंदाचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना भीमाशंकराकडे केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले. (Pune News)
पुजेनंतर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, तहसीलदार तथा देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त प्रशांत बेडसे, गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडीलकर, सरपंच दत्तात्रय हिले आदी उपस्थित होते.
भीमाशंकराचे दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यातून, देशभरातून लाखो शिवभक्त येथे श्रावणातील सोमवारी दर्शनासाठी येतात. आपणही त्यातील एक शिवभक्त असून दरवर्षीप्रमाणेच श्रावणातील दर्शनासाठी आलो आहे. हे प्राचीन देवस्थान असून दर्शन घेऊन समाधान, आनंद लाभतो.
श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास आराखडा २८० कोटी रुपयांचा तयार केलेला असून येथे येण्यासाठीचा रस्ता चांगला करण्यासह येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे श्री. शिंदे माध्यमांशी संवाद साधताना यावेळी म्हणाले.

COMMENTS