MLA Hemant Rasane on MPSC Results | लवकरच जाहीर होणार गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल
| एमपीएससीच्या कारभारावर आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत लक्षवेधी
MPSC – (The Karbhari News Service) – राज्यातील हजारो विद्यार्थी पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र आयोगाच्या विलंबामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जात आहे. २०२३ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ७००७ पदांसाठीच्या गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल अद्यापही जाहीर झाला नसल्याची बाब कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत मांडली. यावेळी न्यायालयाने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात कोणतीही अडचण नसल्याचे नुकतेच सांगितले असून निकालाची प्रत येताच परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. (Maharashtra News)
एमपीएससीच्या माध्यमातून गट क अंतर्गत विविध विभागांसाठी लिपिक व टंकलेखकचा 7007 पदांसाठी 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर काही विद्यार्थी न्यायालयात गेल्याने अंतिम निकाल रखडला होता. नऊ जुलै रोजी न्यायालयाने निकाल जाहीर करण्यास हरकत नसल्याचे सांगितले आहे. न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
आयोगाच्या कार्यपद्धतीतील ढिसाळपणा ही गंभीर समस्या आहे. निकाल वेळेत लागत नाहीत, पात्रता यादी वेळेत जाहीर होत नाही, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होते. MPSC ला निकालासाठी बंधनकारक कालमर्यादा द्यावी, उत्तरदायित्व निश्चित करणारी स्वतंत्र समिती किंवा लोकपाल नेमावा, विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्र व कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र स्थापन करावे, तसेच UPSC प्रमाणे ‘MPSC प्रतिभा सेतु’ उपक्रम सुरू करावा, अशी मागणी यावेळी रासने यांनी सभागृहात केली.
दरम्यान, आशिष शेलार यांनी सांगितले की, “MPSC ही स्वतंत्र संस्था आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिजन मधील १५० दिवस सेवा सुधार कार्यक्रम राबवला जात आहे, यामध्ये MPSC संदर्भातील सुधारणा, निकालातील विलंब, भरती प्रक्रियेतील त्रुटी यांचा समावेश आहे, त्यामुळे रासने यांच्या मागण्यांनुसार सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल”.

COMMENTS