FIEO – MITCON | जागतिक स्तरावर भारतीय निर्यातदारांना वाढत्या संधी | डॉ. अजय सहाय यांचे प्रतिपादन; ‘फिओ’ व ‘मिटकॉन’ यांच्यातर्फे ‘एक्स्पोर्ट कॉन्क्लेव्ह’

HomeCompany

FIEO – MITCON | जागतिक स्तरावर भारतीय निर्यातदारांना वाढत्या संधी | डॉ. अजय सहाय यांचे प्रतिपादन; ‘फिओ’ व ‘मिटकॉन’ यांच्यातर्फे ‘एक्स्पोर्ट कॉन्क्लेव्ह’

Ganesh Kumar Mule May 31, 2025 8:41 PM

Tata Group Vs PMC | टाटाच्या उज्वल कंपनीसोबत घेतलेला पंगा महापालिकेच्या अंगाशी! | बिल अडवून ठेवल्याने महापालिकेचेच नुकसान
GST | तुम्ही व्यवसाय करत असाल, तर जाणून घ्या की जीएसटी नोंदणी कधी महत्त्वाची ठरते|  त्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या
Dhangar, Maratha, Lingayat and Muslim reservation | संसदेत धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणावरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक

FIEO – MITCON | जागतिक स्तरावर भारतीय निर्यातदारांना वाढत्या संधी | डॉ. अजय सहाय यांचे प्रतिपादन; ‘फिओ’ व ‘मिटकॉन’ यांच्यातर्फे ‘एक्स्पोर्ट कॉन्क्लेव्ह’

| केंद्र सरकारच्या विविध निर्यातपूरक व उद्योगाभिमुख योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

Dr Ajay Sahay – (The Karbhari News Service) – “देशाच्या अर्थव्यवस्थेचा आलेख जागतिक पातळीवर सातत्याने उंचावत आहे. तसेच राष्ट्रीय स्तराप्रमाणे जिल्हास्तरावरील वैशिष्ट्यपूर्ण घटकांच्या निर्यातीसाठी विविध योजना आहेत. भारतीय व्यावसायिकांना निर्यातीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत”, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे (एफआयईओ-फिओ) महासंचालक डॉ. अजय सहाय यांनी केले. या पार्श्वभूमीवर उद्योगाभिमुख व विविध निर्यातपूरक योजनांच्या मदतीने निर्यातवाढीच्या संधींचा निर्यातदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयांतर्गत फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन (एफआयईओ), मिटकॉन पुणे व कॅनरा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक्स्पोर्ट कॉन्क्लेव्ह’चे (निर्यात परिषद) आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ‘एफआयईओ’चे महासंचालक डॉ. अजय सहाय यांनी वाढते निर्यात अर्थकारण, ई-कॉमर्स क्षेत्रातील निर्यात, निर्यात क्षेत्रातील जोखीम तसेच निर्यातीच्या संधी, योजना अशा मुद्यांवर विवेचन केले. याप्रसंगी फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स आणि मिटकाॅन यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या व कराराचे आदानप्रदान करण्यात आले. तसेच डॉ. अजय सहाय यांच्या हस्ते मिटकॉनच्या पिंपरी-चिंचवड केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे परिसरातील सात ते आठ लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. मिटकॉनचे चेअरमन अजय अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक आनंद चलवादे, चंद्रशेखर भोसले, डॉ. गणेश खामगळ, संकेत लोंढे आदी उपस्थित होते.

नगर रस्त्यावरील हॉटेल नोवोटेल येथे झालेल्या कार्यक्रमात ‘डीजीएफटी’चे अमित शर्मा, रिझर्व्ह बँकेच्या विदेशी चलन विनिमय विभागाच्या महासंचालक लता राधाकृष्णन, ईसीजीसीच्या महासंचालक अर्पिता सेन, इंडिया पोस्ट पुणे विभागाचे संचालक अभिजीत बनसोडे, कॅनरा बॅंकेच्या ट्रेझरी विभागाचे उपसंचालक केजेएस नाईक, मिटकाॅनचे व्यवस्थापकीय संचालक आनंद चलवादे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. विदेशी व्यापार महासंचालनालय, भारतीय पोस्ट, कॅनरा बँक, मिटकॉन व एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे २०० हून अधिक निर्यातदार, उद्योजक आणि स्टार्टअप प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते.

डॉ. सहाय यांनी केंद्र सरकारच्या निर्यात धोरणातील तरतुदी व बदल यांची माहिती उपस्थितांना दिली. ‘निर्यातीच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा घटक होण्याची संधी उद्योजकांसह स्टार्टअपवाल्यांनीही घेतली पाहिजे. त्यांच्यासाठी एफआयईओची प्रादेशिक कार्यालये त्यांना साह्यकारी ठरतील. डिजिटल माध्यमाद्वाराही निर्यातीच्या अनेक संधी आहेत. भारतीय टपाल विभागाच्या अनेक योजना आहेत. ई-कामर्स निर्यात क्षेत्र विस्तारत आहे. हे सर्व घटक अभ्यासून उद्योजकांनी देशांतर्गत व्यापारवृद्धीसह आंतरराष्ट्रीय पातळीवरही निर्यातीतून ठसा उमटवावा. २०३० पर्यंत दोन ट्रिलियन डाॅलर्सच्या निर्यातीचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे, ते साध्य करण्यासाठी उद्योजकांनी योगदान द्यावे’, असेही डॉ. सहाय म्हणाले.

आनंद चलवादे यांनी सामंजस्य करार झाल्याचा आनंद व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड परिसरात मोठे औद्योगिक क्षेत्र विकसित झाले असून, राज्याच्या निर्यातीमध्ये मोठी भर घालण्याची क्षमता त्यामध्ये आहे. पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, मराठवाडा, खान्देशसह इतर भागात निर्यातीला पूरक क्षेत्र विकसित होत आहे. त्यामुळे निर्यात प्रशिक्षण अभ्यासक्रम, निर्यातदारांची समुपदेशन, मेन्टॉरिंग, याची सुविधा उपल्बध होईल. निर्यात क्षेत्रासंबंधी सर्व माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यातून दरवर्षी सुमारे १००० निर्यातदार तयार करण्याचे ध्येय आहे. त्यातून देशाची व राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल,. नवीन रोजगार उपलब्ध होतील, असे चलवादे यांनी नमूद केले. या उपक्रमात ‘फिओ’ सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन विभागीय संचालक श्री. तिवारी यांनी दिले.

अमित शर्मा यांनी ‘डिजिटल माध्यमातून निर्यातवाढ’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘जिल्हा निर्यात केंद्रे विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे’, असे ते म्हणाले. निर्यात कल, रिझर्व्ह बँकेची त्याविषयीची धोरणे, व्यापारवृद्धीतील चलन विनिमयासंबंधीच्या नियमावली, यांची माहिती लता राधाकृष्णन यांनी दिली. निर्यातवाढीसाठी एक्स्पोर्ट क्रेडिट इन्शुअरन्सचे महत्त्व, या विषयावर अर्पिता सेन यांनी सादरीकरण केले.

अभिजीत बनसोडे यांनी टपाल विभागामार्फत निर्यातीच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. डाकघर निर्यात केंद्रांच्या माध्यमातून जिल्हा पातळीवरही निर्यातीची सुविधा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. थेट पार्सल सेवाही सुरू असून, त्याचा लाभ निर्यातदारांनी घ्यावा, तसेच इंटरनशनल मेल प्राॅडक्ट ऑफरिंग सुविधाही असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन सीएसनाईन एंटरटेनमेंट्सचे चेतन गिरी यांनी केले.