Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सवात लहान मुलांसाठी पर्वणी | विविध स्पर्धा, कार्यशाळा, चित्रपट महोत्सवाचा समावेश
National Book Trust – (The Karbhari News Service) – राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव लहान मुलांसाठी पर्वणी ठरणार आहे. महोत्सवाअंतर्गत चित्रकला, लेखन अशा स्पर्धा, कार्यशाळा, विविध भाषांतील चित्रपटांचा महोत्सव होणार आहे.
यंदाच्या महोत्सवात मुलांसाठीच्या उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे. महोत्सवांत लहान मुलांसाठीच्या पुस्तकांची दालने असणार आहेत. त्याशिवाय स्वतंत्र चिल्ड्रन्स कॉर्नर – बाल विभाग करण्यात आला आहे. त्यात चित्रकला स्पर्धा, लेखन स्पर्धा, मातीकाम, नाट्य कार्यशाळा असे उपक्रम खास मुलांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. यात ज्येष्ठ लेखिका माधुरी पुरंदरे, ज्येष्ठ लेखक राजीव तांबे, नाट्य प्रशिक्षक आणि कथानकथनकार पूजा उपळंगवार, लेखिका विद्या नेसरीकर यांच्यासारखे मान्यवर विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तर १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात पाच मिनिटांच्या शॉर्टफिल्मपासून पूर्ण लांबीच्या चित्रपटांचा समावेश आहे. मराठीसह इंग्रजी, पर्शियन, हिंदी, तुर्कीश, चायनीज, बंगाली, रशियन, तेलुगू अशा विविध भाषांतील शॉर्टफिल्म, डॉक्युमेंट्री, चित्रपट दाखवले जाणार आहेत.
राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक म्हणाले, की लहान मुलांना वाचक म्हणून घडवणे, मुलांमधील विविध कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने बाल विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. मुलांसाठी स्वतंत्र चित्रपट महोत्सवही आहे. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवात मुले पालकांसह विविध उपक्रमांत सहभागी होऊ शकतात.
शिक्षकांसाठीही प्रशिक्षण
महोत्सवात मुलांसाठीच्या उपक्रमांवर भर देतानाच शिक्षक, प्रशिक्षकांसाठी ट्रेनिंग द ट्रेनर्स – प्रशिक्षकांचे प्रशिक्षण हा नवा विभाग सुरू करण्यात आला आहे. शिक्षक आणि प्रशिक्षकांना त्यांच्या रोजच्या आव्हानांवर मात करण्यासाठी योग्य कौशल्ये शिकवणे, मुलांना गुंतवून ठेवण्यासाठीची कौशल्य विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
COMMENTS