Dwajdin Nidhi | सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे- महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले
Dr Rajendra Bhosale IAS – (The Karbhari news Service) – मातृभूमीची सेवा बजावतांना वीरमरण आलेल्या, जखमी झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याकरीता प्रशासनासोबतच नागरिकांनी सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन -२०२४ निधी संकलन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दिपक ठोंगे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल सतेश हंगे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त डॉ. भोसले म्हणाले, सैनिक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करतात. पुणे जिल्हा प्रशासनाने ध्वजदिन निधी संकलनात कर्तव्य समजून आपले योगदान देवून त्यांच्या व कुटुंबियांना पाठीशी खंबीरपणे उभे राहुया. पुणे जिल्हाकरीता ध्वजदिन निधी संकलनाबाबत देण्यात आलेले उद्दिष्टपुर्तीकरीता जिल्हा प्रशासनाचे पुढाकार घ्यावा, येत्या 31 मार्च अखेर 5 कोटीहून अधिक रक्कमेचे ध्वजदिन निधी संकलन होईल, याकामी पुणे जिल्हा राज्यात क्रमांक एकवर राहील, यादृष्टीने काम करावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, माझा देश व नागरिक सुरक्षित राहावे, याभावनेने देशाचे सैनिक देशाच्या सुरक्षितेकरीता आपल्या कुटुंबाला सोडून सीमेवर देशाचे रक्षण करीत असतात. राष्ट्राप्रती असलेले त्यांचे अत्युच्च बलिदान व असिम त्याग यापेक्षा दुसरे कोणतेही मोठे कार्य नाही. जिल्ह्यात माजी सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यात माजी सैनिक व त्यांचे पाल्यांकरीता जिल्ह्यात कार्यालये, माजी सैनिक वसतीगृहे आहेत. माजी सैनिकांच्या पाल्यांना राज्य सरकाच्यावतीने शिष्यवृती देण्यात येते. माजी सैनिकांना सेवानिवृत्तीवेतन अदा करण्यात येते, वीर पत्नींना जमिनी दिल्या जातात, अशा विविध सोई-सुविधा त्यांना उपलब्ध करुन त्यांचे पुढील जीवन सुखकर होईल, याकरीता जिल्हा प्रशासन सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही, डॉ. दिवसे यांनी दिली.
सैनिकांचा आदर करने आपले कर्तव्य समजले पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्या सेवेतून आपण आदर्श घेतला पाहिजे, त्यामुळे सर्व कार्यालय प्रमुखांनी आपले कर्तव्य समजून ध्वजनिधीत उत्सर्फूतपणे योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले.
प्रास्ताविकात ले. कर्नल हंगे म्हणाले, पुणे जिल्ह्याला ध्वजदिन निधी २०२३ करीता २ कोटी ५९ लाख ८५ हजार रुपये इतके उद्दिष्ट देण्यात होते. त्यापैकी २ कोटी १६ लाख ८५ हजार इतके ध्वजदिन निधीचे संकलन करण्यात आले असून एकूण ८३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ध्वजदिन निधीतून माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या विधवा, पाल्य, यांच्याकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. ध्वजदिन निधी माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठीच खर्च होत असल्याने जिल्ह्यातील सर्व सैनिक संघटनांनीदेखील निधी संकलन करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात ध्वजदिन निधी संकलन करणाऱ्या विविध संस्था, शासकीय कार्यालय यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक व त्यांच्या गुणवंत पाल्याचा विशेष करुन त्यांना धनादेश वितरण करण्यात आले.
COMMENTS