Pune Book Festival | विद्यार्थी, प्राध्यापक, ग्रंथपालांच्या सहभागाने पुणे पुस्तक महोत्सव अधिक फुलणार
| विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, पालकांनी पुणे पुस्तक महोत्सवात सहभागी होण्याबाबत उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या सूचना
Pune Pustak Mahotsav – (The Karbhari News Service) – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असतानाच, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल यांच्या सहभागाने यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव अधिक भव्य होणार आहे. या महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकांनी सहभागी होत वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले आहे.
एनबीटीच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणावर येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाला पुणे, नगर, नाशिकसहसह राज्यातील विविध ठिकाणचे वाचन प्रेमी भेट देणार आहेत. त्या अनुषंगाने आकर्षक मंडप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठ्या स्टेजच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासोबतच महोत्सवात अधिकाधिक युवकांचा सहभाग होण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक आणि एनबीटीचे विश्वस्त राजेश पांडे यांची आग्रही भूमिका आहे. त्याला अनुसरून एनबीटीने महोत्सवात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी उच्च शिक्षण विभागाकडे पत्रांद्वारे पाठपुरावा केला होता.
त्यानंतर उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर यांनी पुणे विद्यापीठ आणि उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांना महोत्सवात सहभागी होण्याबाबत सूचना केल्या आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पुणे पुस्तक महोत्सवाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने, महाविद्यालयात आणि वर्गांमध्ये माहिती द्यायची आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या सूचना फलकांवर महोत्सवाची माहिती आणि विविध उपक्रमांना प्रसिद्धी द्यायची आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील खासगी विद्यापीठांनाही महोत्सवात आपला सहभाग नोंदवता येणार आहे. या महोत्सवात पालक वर्गाला सहभागी करण्यासाठी, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवावी, असे आवाहनही डॉ. देवळाणकर यांनी केले आहे.
…..
विद्यार्थ्यांसाठी भरपूर संधी
….
पुणे पुस्तक महोत्सवात शांतता…पुणेकर वाचत आहे, ज्ञानसरिता ग्रंथ दिंडी, ग्रंथपालांचे संमेलन असे सुरुवातीच्या टप्प्यात काही उपक्रम आहेत. यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल, कर्मचाऱ्यांना सहभागी होता येणार आहे. त्याचप्रमाणे संमेलनात शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, कवी, लेखक, चित्रकार, पत्रकार, उद्योजक यांना भेटण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. आनंद काटीकर ( संपर्क क्रमांक ९४२१६१०७०४) आणि डॉ. संजय चाकणे ( संपर्क क्रमांक ७०२०६७४५४५) यांना संपर्क साधता येईल, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
COMMENTS