Sanvidhan Rally | पुणे शहरात ७५ वी संविधान रॅली संपन्न
Dr Suhas Diwase IAS – (The Karbhari News Service) – सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत ७५ वी संविधान रॅली आयोजित करण्यात आली. (Pune News)
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून कॅम्प येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे डॉ. दिवसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून संविधान रॅलीची सुरुवात करण्यात आली. नवीन जिल्हा परिषद – ब्ल्यू नाईल हॉटेल चौक – पोलीस आयुक्त कार्यालय चौक – समाजकल्याण आयुक्तालय – एसबीआय बँक चौक – बंडगार्डन पोलीस ठाणे चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, ससून रुग्णालयासमोर यामार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा येथे संविधान रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी मोठे बॅनर्स, घोषवाक्य फलक घेऊन रॅलीत सहभागी झाले. बार्टी कार्यालयामार्फत चित्ररथाची व्यवस्था करण्यात आली. येरवडा येथील सफाई कामगारांच्या मुलांची शासकीय निवासी शाळा मधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा परिधान करुन समाजाला समानता-बंधुता व एकात्मतेचे दर्शन घडविले.
यावेळी बार्टीच्या उपायुक्त वृषाली शिंदे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, राधाकिसन देवडे, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता डॉ. आम्रपाली मोहिते आदी उपस्थित होते.
या संविधान रॅलीमध्ये समाजकल्याण, बार्टी तसेच विविध शाळा, विद्यालय व महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासह सुमारे ३ हजार नागरिक उपस्थित होते.
COMMENTS