36th Pune Festival | पुणे फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत- उपमुख्यमंत्री अजित पवार  | अजित पवार यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन

HomeBreaking News

36th Pune Festival | पुणे फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत- उपमुख्यमंत्री अजित पवार | अजित पवार यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन

Ganesh Kumar Mule Sep 13, 2024 9:56 PM

Pune Municipal Corporation Latest News | औद्योगिक दराच्या पाणी बिलाबाबत पुणे महापालिकेला दिलासा नाहीच! 
103 flood-affected societies : पानशेत पूरग्रस्त 103 सोसायट्यांना अजितदादा पवार यांची  शिवभेट : राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहर अध्यक्ष नितीन कदम यांची माहिती 
Chandrakant patil : मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही : चंद्रकांत पाटील 

36th Pune Festival | पुणे फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत- उपमुख्यमंत्री अजित पवार

| अजित पवार यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन

 

Pune Festival – (The Karbhari News Service) –  सुमधूर सनईवादन, सेतू-कथ्थक व भरतनाट्यमचा मिलाफ असणाऱ्या नव्या स्वरूपातील नृत्याविष्कारातून गणेशवंदना, महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठांवर आधारित संबळवादन, गुजराती लोकनृत्य डांग, डाकला या गुजराती संगीतावर आधारित गरबा नृत्य, राष्ट्रीय एकात्मतेचा दर्शन घडविणारे ईशान्य भारतातील बांबू नृत्य, द ग्लोरी ऑफ सरहद, आंतरराष्ट्रीय सलोख्याचा संदेश देणारा ‘वसुधैव कुटुम्बकम्’ नृत्याविष्कार, महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या लावणीच्या ‘ऱ्हिदम ऑफ लावणी’ श्री गणेश आरती….अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने ३६ व्या पुणे फेस्टिव्हलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. (Ajit Pawar)

पुणे हा फेस्टिव्हल सर्वांचा कार्यक्रम असून त्याचे आकर्षण वाढले पाहिजे, फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासोबत पुण्याची सांस्कृतिक चळवळ अशीच बहरत राहण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे, याकरीता शासन पाठीशी खंबीरपणे उभे राहिल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी केले.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे भारत सरकारचा पर्यटन विभाग, राज्याचे पर्यटन संचालनालय, पुणे फेस्टिव्हल कमिटी आणि पुणेकर नागरिक संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, आमदार सतेज पाटील, रवींद्र धंगेकर, पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पर्यटन उपसंचालिका शमा पवार, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अभय छाजेड, उल्हास पवार, रमेश बागवे, डॉ. सतीश देसाई आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मंगलमय, भक्तीमय वातावरणात अतिशय आनंदाने, उत्सवाने साजरा केला जातो. गणेशोत्सव ही पुण्याची एक ओळख असून ती जागतिक पातळीवर नेण्याचे काम पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून करण्यात आले आहे. येथे सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम कलावंत आपली कला सादर करीत असतात तसेच स्थानिक कलाकारांनादेखील आपली कला सादर करण्याचा संधी या फेस्टिवलमधून मिळते, समाजात उत्तमपणे काम केलेल्या व्यक्तींची नोंद घेऊन त्यांचा गौरव करण्याचे काम करण्यात येते, ही अभिनंदनीय व अभिमानास्पद बाब आहे.

सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्याकरीता प्रयत्न करावेत
लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली त्या हेतूला बाधा येता कामा नये, सार्वजनिक कार्यक्रम साजरा करताना सामाजिक ऐक्य टिकले पाहिजे, यादृष्टीने प्रबोधन झाले पाहिजे. सामाजिक भान ठेवून लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, समाजा-समाजात तेढ निर्माण होणार नाही याबाबत सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. समाजातील अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा
राज्यातील विविध शहरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. जल, जमीन, वायू, ध्वनी, निसर्गाचे प्रदूषण टाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात केले पाहिजे. पाण्यात विरघळणाऱ्या शाडूच्या मूर्तीचा वापर केला पाहिजे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डीजे व गुलालविरहित मिरवणूक काढावी. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर केला पाहिजे. गणपती विसर्जनावेळी निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. निर्माल्यापासून खताची निर्मिती करावी, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.

खासदार प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सव हा देशभरात गाजणारा उत्सव आहे. पुण्यात आयोजित होणारे विविध कार्यक्रम आपल्या जडणघडणीचा भाग होतात. पुणे फेस्टिव्हलमध्ये विविध सांस्कृतिक, व्याखानमाला यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याने पुण्याचा सांस्कृतिक वारसा उन्नत होत आहे, असेही प्रा. कुलकर्णी म्हणाल्या.

आमदार श्री. पाटील म्हणाले, पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमतातून गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे काम करण्यात आले आहे. यापुढेही ही पंरपरा कायम ठेवण्याकरीता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा फेस्टिव्हल जागतिक पातळीवर नेण्याचे काम करण्याची गरज आहे राज्यातही सामाजिक बांधिलकीचे संदेश देण्याकरीता याप्रमाणे उपक्रमाचे आयोजन करावे, असेही श्री. पाटील म्हणाले.

शमा पवार म्हणाल्या, पर्यटन विभागाच्यातीने जाहीर करण्यात आलेल्या पर्यटन धोरणाच्या अनुषंगाने पुणे फेस्टिव्हलमध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. तसेच आकृती ग्रुपच्यावतीने राज्यातील महत्वाची पर्यटन स्थळे ५० फुटी कॅनव्हासवर रेखाटण्यात आली असून त्याची नोंद जागतिक विक्रमात झाली आहे. या फेस्टिवलच्या आयोजनाकरीता पर्यटन विभागाच्यावतीने यापुढेही असेच सहकार्य करण्यात येईल, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

श्री.कलमाडी यांचे स्वागतपर भाषण यावेळी वाचून दाखविण्यात आले. त्यात ते म्हणाले, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि पुण्याचे नाव देशात जावे या उद्देशाने पुणे फेस्टिवलची सुरुवात करण्यात आली. या महोत्सवाने पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे कार्य केले आहे.

कार्यक्रमात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. पी.डी. पाटील यांना या वर्षीचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ तसेच ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, ‘सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्राचे देवराम गोर्डे यांना पुणे फेस्टिव्हल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कै. प्रतापराव ऊर्फ तात्या गोडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘जय गणेश पुरस्कार’गणेश पेठ पांगुळ आळी सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांना प्रदान करण्यात आला. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त गोळाफेकपटू सचिन खिलारी यांचाही सन्मान करण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0