Bandara Dongar | काल्याच्या महाप्रसादाने भंडारा डोंगरावरील अखंड गाथा पारायण सोहळ्याची सांगता

Homeपुणेsocial

Bandara Dongar | काल्याच्या महाप्रसादाने भंडारा डोंगरावरील अखंड गाथा पारायण सोहळ्याची सांगता

गणेश मुळे Feb 22, 2024 3:47 AM

bhandara Dongar Trust | भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
Marathwada Janvikas Sangh | मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला मंडळांना ज्ञानेश्वरी, हस्तलिखित एकनाथी भागवत व रोप वाटप
Tribal Brides Grooms | पिंपळे गुरवमध्ये आदिवासी वधू वरांचा १३ वा मेळावा उत्साहात संपन्न

Bandara Dongar | काल्याच्या महाप्रसादाने भंडारा डोंगरावरील अखंड गाथा पारायण सोहळ्याची सांगता

Bhandara Dongar |  पहाटेचा काकडा, अभिषेक, महापूजा, हरिपाठ, नांदेड जिल्ह्यातील वाकुळणी येथील संतपीठाचे प्रमुख, सामुहिक पारायण, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा व जागर अशी दैनंदिनी असलेल्या सप्ताहाची सांगता हभप, गुरुवर्य उमेश महाराज दशरथे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

संपूर्ण सप्ताहभर रोज उसळणारी भाविकांची अलोट गर्दी, भक्तीमय, उसाही वातावरणात माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने वसंतपंचमीपासून श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर सुरु झालेल्या ‘अखंड गाथा पारायण व कीर्तन महोत्सवाची’ सांगता बुधवारी ह.भ.प. गुरुवर्य उमेश महाराज दशरथे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, उद्योजक विजय जगताप, ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद व सर्व विश्वस्त मंडळ, तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपजोनिया पुढती येऊ | काला खाऊ दहीभात || वैकुंठी तो ऐसे नाही | कवळ काही काल्याचे || या तुकोबारायांच्या अभंगावर निरुपण करीत ह.भ.प. गुरुवर्य उमेश महाराज दशरथे यांनी गोकुळातील भगवंताच्या विविध लीला अनेक रुपकांमधून व दृष्टांतामधून सांगितल्या.

तत्पूर्वी गाथा पारायणाची समाप्ती होताच उपस्थित हजारो भाविकांनी तुकोबारायांची गाथा व तुळशी वृंदावन डोक्यावर घेत मुख्य मंडपातून हरिनामाचा गजर करीत दिंडीने डोंगराला प्रदक्षिणा घातली. ज्ञानोबा- तुकाराम असा एकच नामघोष करीत महिला व पुरुष भाविकांनी फेर धरीत फुगड्या खेळल्या.

श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व दशमी सोहळा समितीच्यावतीने या सोहळ्यासाठी सहकार्य करणारे कीर्तनकार, गायक, वादक, वाचक, भाविक श्रोते, आचारी, मंडपवाले, तसेच आर्थिक व वस्तुरुपू देणगी देणारे सर्व दानशूर दाते, अहोरात्र झटणारे सर्व तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ, महाप्रसादाचे वाटप करणारे खांडी, बोरवलीचे ग्रामस्थ, पायथ्यापासून मंदिरापर्यंत मोफत बस सेवा पुरविणारे युवा उद्योजक गणेश बोत्रे, देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, दररोज पाण्याचा टँकर पुरविणारे मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्या सहकार्याबद्दल ट्रस्टच्यावतीने ह.भ.प. बाळासाहेब काशीद यांनी आभार मानले.

दरम्यान, काल्याच्या कार्यक्रमासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. डोंगरावर एक किलोमीटरपेक्षा जास्त लांब रस्त्याच्या दुतर्फी दुचाकी व चारचाकी वाहनांची रांग लागली होती. काल्याचे कीर्तन संपल्यानंतर भोजन मंडपात व मुख्य मंडपात महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. लवकरात लवकर मंदिर निर्माणाचे कार्य पूर्णत्वास जावो व या भव्य-दिव्य मंदिराचा कळस लवकरात लवकर पाहण्याचे भाग्य आम्हांला लाभो असे तुकोबारायांना साकडे घालीत हजारो भाविकांनी साश्रू नयनांनी भंडारा डोंगराचा निरोप घेतला.

श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त, कीर्तनकार ह.भ.प. रवींद्र महाराज ढोरे यांची नात व इंदुरी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार ढोरे यांची कन्या अपूर्वा ढोरे यांनी सार्थ ज्ञानेश्वरीचे मुक्त चिंतनातून इंग्रजीत भाषातंर केले असून, या हस्तलिखित सार्थ ज्ञानेश्वरीचे प्रकाशन ह.भ.प. रविदास महाराज शिरसाठ यांच्या हस्ते, ट्रस्टच्या सर्व पदाधिका-यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.