तळजाई वन्य प्रकल्पाला भाजपचा विरोधच
टेकडी वाचवण्यासाठी कटिबद्ध
: आमदार माधुरी मिसाळ
पुणे: – तळजाई टेकडीवरील 107 एकर जागेवर 120 कोटी रुपये खर्च करून प्रस्तावित करण्यात आलेल्या वन्य विकास प्रकल्पाला भाजपचा विरोधच असल्याची भूमिका आमदार माधुरी मिसाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.
: माझ्याशी चर्चा केली नाही
आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘सुमारे तीन वर्षांपूर्वी काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी या वन विकास प्रकल्पाचा प्रस्ताव आणला होता. त्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या संदर्भात स्थानिक आमदारांशी चर्चा करून निर्णय घ्या असे ठरविण्यात आले होते. परंतु या विषयी माझ्याशी कोणतीही सविस्तर चर्चा करण्यात आली नाही.’
मिसाळ पुढे म्हणाल्या, ‘गेल्या महिन्यात प्रशासनाच्या माध्यमातून हा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला. त्यावर मी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव घाईघाईत मंजूर करू नका. प्रशासन, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत त्याचे सविस्तर सादरीकरण व्हावे अशी सूचना केली. त्या सूचनेनुसार स्थायी समितीने प्रस्ताव मान्य केला नाही. तसेच या प्रस्तावाचे स्थानिक आमदारांसमोर सादरीकरण करण्याचे प्रशासनाला आदेश दिले.’
प्रशासनाच्या माध्यमातून खासगी आर्किटेक्ट हा प्रस्ताव सादर करतो म्हटल्यावर या प्रकरणातील गूढ वाढले होते. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, काँक्रीटीकरण, टेकडीचा ऱ्हास होऊन जैववैविध्य संपुष्टात येण्याची भीती होती. म्हणूनच स्थायी समितीत आम्ही हा प्रकल्प रोखला. आम्ही स्थानिक नागरिक आणि संघटना यांच्याबरोबर असून तळजाई टेकडी वाचविण्यासाठी कटिबध्द असल्याचे आमदार मिसाळ यांनी सांगितले.
COMMENTS