स यादीतील एकही काम करू नका!
: महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश
: नगरसेवकांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर झटका
पुणे: कोरोनाची परिस्थिती, त्यामुळे महापालिकेचे घटलेले उत्पन्न यामुळे विकास कामे करताना आर्थिक चणचण भासत आहे. यामुळे महापालिका प्रशासन विरुद्ध नगरसेवक असा सामना रंगताना दिसतो आहे. आयुक्तांनी नुकतेच सह यादीतील 30% पेक्षा जास्त कामे करण्यास नकार दिला होता. त्यामुळे हा वाद अजूनच वाढला होता. त्यातच आता महापालिका आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना इथून पुढे सह यादीतील एक ही काम करू नका, असे आदेश दिले आहेत. शिवाय खात्याचे देखील अति महत्वाचे काम असेल तरच त्याला परवानगी दिली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे 30% पेक्षा जास्त निधी मिळणार म्हणून वाट बघत बसलेल्या नगरसेवकांना आता एक छदाम ही निधी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा नगरसेवकांना झटका मानला जात आहे. यावर हे माननीय काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
: महिन्याभरानंतर वित्तीय समितीची बैठक
महापालिका आयुक्तांनी मंगळवारी सकाळी 9:30 वाजताच महिन्याभरानंतर वित्तीय समितीची बैठक घेतली. त्यात विभाग प्रमुखांनी सह यादी आणि खात्याच्या कामाचे प्रस्ताव मंजुरी साठी ठेवले होते. मात्र आयुक्त विक्रम कुमार यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले कि, इथून पुढे सह यादीतील कुठलेही काम माझ्यासमोर आणू नका. त्याला मंजुरी दिली जाणार नाही. फक्त खात्याची कामे केली जातील. ती हि अति महत्वाची असतील तरच आणि त्यालाही फक्त 30% इतकाच निधी उपलब्ध असेल. हे काम देखील छाननी करूनच केले जाणार आहे. महापालिकेचे घटलेले उत्पन्न, त्यातच आता वेतन आयोगामुळे महापालिका सेवकांना 8 महिन्याचा द्यावा लागणारा पगार, हे सर्व पाहता विकासकामांना निधी देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळेच आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
: माननीय काय भूमिका घेणार?
मात्र आता आयुक्तांच्या या निर्णयावर माननीय काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण निधी देण्यावरून सत्ताधारी भाजप आणि आयुक्त असा वाद महापालिकेत रंगलेला पाहायला मिळाला होता. शिवाय स्थायी समिती सदस्य आणि अध्यक्षांनी प्रशासनाचा निषेध करत स्थायी समिती देखील एकदा तहकूब केली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या आठवड्यात कसलाही गोंधळ न होता स्थायी समितीची बैठक झाली होती. त्यावेळी स्थायी समिती अध्यक्षांनी सांगितले होते कि, प्रशासनासोबत आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. याबाबत प्रश्न देखील उपस्थित झाले होते. नगरसेवक मात्र 30% पेक्षा जास्त निधी मिळणार म्हणून खुश होते. मात्र आता आयुक्तांनी त्यांच्या या आनंदावर पाणी फेरले आहे. कारण आता सह यादीतील कुठलेही काम होणार नाही, असे आयुक्तांनी सांगितले आहे.
महापालिका निवडणूक तोंडावर आहे. उद्याच याच्या प्रभाग रचनेचा निर्णय होणार आहे. त्यामुळे आपण प्रभागात किती जास्त काम करू, या विवंचनेत नगरसेवक आहेत. मात्र आता निधीच मिळणार नसल्याने त्यांना निराश व्हावे लागणार आहे.
COMMENTS