सिध्दार्थनगर वासियांच्या घरांसाठी सहा पर्याय! | महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव
| आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश
पुणे : सिध्दार्थनगर (विमाननगर) येथील रस्ता बाधित झोपडपट्टीवासियांच्या पुर्नवसनाचा प्रश्न अखेर 14 वर्षानंतर सुटणार आहे. येथील बांधितांना घरे देण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सहा ठिकाणांवरील घरांचे पर्याय ठेवले आहेत. यासंबधीच्या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
पुण्यात 2009 मध्ये झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धांसाठी सिद्धार्थनगर झोपडपट्टीतून जाणार्या व्हीआयपी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. यामध्ये जवळपास 200 झोपड्या आणि 15 दुकाने यामध्ये बाधित झाली होती. या बाधितांचे महापालिकेकडून पुर्नवसन केले करण्याचे आश्वासन तत्कालीन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले होते. मात्र अद्यापपर्यंत या बांधितांना घरे मिळाली नव्हती. यासंदर्भात आमदार सुनिल टिंगरे यांनी हिवाळी अधिवेशनात याबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून लक्ष वेधले. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. त्यानंतर या पुर्नवसनाच्या प्रश्नाला गती मिळाली. त्यानुसार आता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या सिध्दार्थनगर रस्ता बांधितांना भाडेतत्वावर घरे देण्यासाठी खराडीतील दोन ठिकाणी, लोहगाव (विमाननगर) मधील दोन ठिकाणी तसेच वडगाव शेरी आणि हडपसर अशा सहा ठिकाणी घरांचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. आता बांधितांना यामधून कोणती ठिकाणी घरे आहेत हे निवडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार बांधितांनी घरांचा पर्याय निवडल्यानंतर पात्र- अपात्र यादी तपासून वडगाव शेरी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनी त्यासंबधीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवायचा आहे. त्यानंतर स्थायी समिती आणि मुख्यसभेच्या मंजुरीने संबधित घरे बांधितांना दिली जाणार आहे.
————————–
सिध्दार्थनगर येथील रस्ता बाधितांच्या पुर्नवसनाला गती मिळाली याचा विशेष आनंद होत आहे. या नागरिकांना तब्बल 14 वर्षांची तपर्श्या करावी लागली. मात्र, आता लवकरच त्यांना हक्काचे घर मिळेल. त्यासाठी अखेरपर्यंत माझा पाठपुरावा राहिल.