Sahitya Akademi Award | ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार

HomeपुणेBreaking News

Sahitya Akademi Award | ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार

Ganesh Kumar Mule Dec 23, 2022 5:59 AM

Amit Shah : Book : ‘अमित शाह आणि भाजपची वाटचाल’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन
Meditations by Marcus Aurelius | This book written 2 thousand years ago will change your life!
Why We Sleep | तुम्हांला माहित आहे का झोप तुमचं वजन कमी करतं! | Why We Sleep हे पुस्तक तुम्हांला शिकवेल झोपेचे महत्व 

‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार

|’सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ पुस्तकास अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार

 

नवी दिल्ली| प्रसिध्द लेखक प्रवीण बांदेकर (Writer Pravin Bandekar) यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीकरिता (Novel) सा‍हित्य अकादमी पुरस्कार (sahitya Akademy Award) तर प्रमोद मुजुमदार (Pramod Mujumdar) यांना ‘सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ या अनुवादित पुस्तकासाठी आज मराठी भाषेकरिता अनुवादाचा (Translation) साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला.

अकादमीचे सचिव, श्री के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कोपर्निकसमार्ग स्थित रविंद्र सभागृहात वर्ष 2022 साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 23 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. (sahitya akademy award)

प्रवीण बांदेकर यांच्या लेखनकार्याविषयी

मूळचे सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील प्रसिध्द लेखक प्रवीण दशरथ बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरी करिता साहित्य अकादमी पुरस्कार 2022 साठी जाहीर झाला.

त्यांच्या कविता, कादंबरी, ललित लेखन, बाल साहित्य व अनेक समीक्षा प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी महाविद्यालयीन दिवसांपासून लेखनाला सुरूवात केली असून त्यांची चाळेगत कादंबरी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व सोलापूर विद्यापीठ येथे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.

गेल्या 20-25 वर्षांपासून लेखन कार्य करत आलेल्या श्री. बांदेकर यांनी त्यांच्या कादंबरीत कोकणातील विविध सामाजिक प्रश्न, मानवी नात्यातील गुंते, धार्मिक व राजकीय अनुभव बाहुल्यांच्या माध्यमातून कथन केले आहेत. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला व साहित्याच्या माध्यमातून कथन केलेले अनुभव, वेगवेगळ्या समस्या जास्तीत-जास्त लोकांसमोर येतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

प्रमोद मुजुमदार यांच्या लेखनकार्याविषयी

सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ या मराठी अनुवादित पुस्तकासाठी प्रमोद मुजुमदार यांना आज मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आला.

मूळचे पुण्याचे असलेले श्री. प्रमोद श्रीनिवास मुजुमदार यांनी मुंबई विद्यापीठातून विज्ञान क्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे. वर्ष 1999 पासून मुक्त पत्रकार म्हणून कारकीर्द आरंभ करत, त्यांनी दैनिक महानगर, साप्ताहिक कलमनामा या नियतकालिकांत पंधरा वर्षे लिखाण केले व आरोग्य, शहरीकरण आणि पर्यावरण इ. विषयांवर स्तंभ लेखन करत आले आहेत. सध्या ‘सलोखा संपर्क गटात’ त्यांचा सहभाग आहे. त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके ही प्रकाशित झाली आहेत. अस्तित्वाचे प्रश्न, गुजरात पॅटर्न, आरोग्याचा बाजार, (अनुवाद आणि रूपांतर), सलोख्याचे प्रदेश (अनुवाद), दास्ताँ-ए-जंग सारखी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

‘सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ हे पुस्तक, श्री मुजुमदार यांनी इंग्रजी पुस्तक, ‘इन गुड फेथ’ या मूळ पुस्तकाचा मराठी भाषेत केलेला अनुवाद आहे. प्रख्यात लेखिका श्रीमती सबा नक्वी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. श्रीमती नक्वी यांनी कश्मीर ते कन्याकुमारी व मणीपूर ते महाराष्ट्रात असलेल्या सार्वजनिक, धार्मिक स्थळांना व लोकप्रिय दैवतांचे दर्शन घेवून, मंदिरांना प्रत्यक्ष भेट देवून त्यांचा सार्वत्रिक सलोख्यासाठी पुस्तकात इतिहास मांडला आहे. या पुस्तकाचा अनुवाद श्री मुजुमदार यांनी केला असून त्याबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला.

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, प्रख्यात साहित्यिक प्रो. भालचंद्र नेमाडे व प्रसिद्ध लेखक नितीन रिंधे या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता. साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये रोख रक्कम तसेच अनुवादनासाठी निवड झालेल्या पुरस्कारकर्त्यांना 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा 11 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथील कमानी ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती, सचिव श्री. के. श्रीनिवासराव यांनी दिली. तसेच अनुवादाबाबतचे पुरस्कारांच्या वितरणाबाबतची तारीख निश्चित झाल्यावर कळविण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.