दोन दिवसात ९५० किलो प्लास्टिक जप्त | ५५ हजाराचा दंड केला वसूल
| महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त कारवाई
महापालिका प्रशासन (PMC pune), तसेच केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB, CPCB) शहरात मागील दोन दिवसांत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत, बंदी असलेल्या तब्बल 950 किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या (Plastic seized) जप्त केल्या. तसेच या कारवाईत व्यावसायिकांकडून सुमारे 55 हजारांचा दंडही वसूल केला आहे.
पर्यावरणास घातक असलेल्या प्लॅस्टिकवर बंदीसाठी 2018 मध्ये कायदा केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी या तीनही विभागांकडून संयुक्त कारवाई केली जाते. त्या अंतर्गत मंगळवारी आणि बुधवारी या संयुक्त पथकाने महात्मा फुले मंडई, मार्केटयार्ड आणि वाघोली परिसरात कारवाई केली. यामध्ये पहिल्या दिवशी 450 किलो तर दुसऱ्या दिवशी सुमारे 500 किलो प्लॅस्टिक जप्त केले. 9 ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे 55 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शशिकांत लोखंडे, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संदीप पाटील, महापालिकेचे आरोग्य निरीक्षक इमामुद्दीन इनामदार, राजेश रासकर, उमेश देवकर यावेळी उपस्थित होते.