गणपती विसर्जनासाठी महापालिकेकडून ३०३ ठिकाणे निश्चित
|पुणे महापालिकेची गणेश उत्सवाची तयारी पूर्ण
पुणे : पुणे शहरात सर्वत्र गणेशोत्सव कोरोना विषयक सर्व नियम पाळून आनंदाने व मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे. यंदाचे वर्षी गणेशोत्सव करिता पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व स्तरावर आवश्यक ती पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. गणपती विसर्जनासाठी महापालिकेकडून ३०३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
गणेशोत्सवाच्या तयारीचे दृष्टीने १५ क्षेत्रिय कार्यालयांनी त्यांचे परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, ग्रुप स्विपींग, कंटेनर, निर्माल्य कलश, किटकनाशक फवारणी विसर्जन घाटांवर अग्निशमनदल कर्मचारी व्यवस्था, घाटांवर औषध फवारणी नदी किनारच्या विसर्जन घाटांवर विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सोय करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर जीवरक्षकांच्या नियुक्त्या सर्व ठिकाणी फिरते हौदांची व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्या यांचे गळतीची व इत्यादी बाबतची त्वरीत दुरुस्ती कामे करणेकरिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत. आवश्यकतेनुसार मंडप, बॅरिकेटस उभारणेत आलेले आहेत.
सार्वजनिक स्वच्छता गृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सुचना फलक आदी स्तरावरुन तयारी करणेत आलेली आहे. पुणे महानगरपालिकेकडील सर्व क्षेत्रिय कार्यालयांच्या परिसरात विविध ठिकाणी तसेच नव्याने समाविष्ट गावामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी मंडप व्यवस्था, मुर्ती संकलन / दान केंद्रे सुरक्षेसाठी बॅरिकेटस, कृत्रिम हौदाची तसेच फिरते हौदांची सोय केलेली आहे. आपल्या घरातील निर्माल्य सार्वजनिक ठिकाणी किंवा नदी / तलाव या ठिकाणी न टाकता महानगरपालिकेच्या यंत्रणेकडे सूपूर्त करावे. यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व मुर्ती संकलन / दान केंद्राच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. गणेश विसर्जन हौदाच्या ठिकाणी हौद व परीसराच्या स्वच्छतेसाठी मनपा सेवकांची १० दिवस रोज दोन पाळीमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडील सर्व अग्निशमन केंद्रे २४ तास सतर्क ठेवण्यात येऊन नागरिकांना मदत लागल्यास अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. १०१ व ०२०-२६४५१७०७ वर संपर्क साधावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.