10 वी, 12 वी शिष्यवृत्ती : महापालिकेकडे 16 हजार 49 अर्ज प्राप्त
: महापालिकेची बिले तयार करण्याची प्रक्रिया सुरु
पुणे : पुणे महापालिकेतर्फे (Pune Corporation) इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे आॅनलाइन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ (Website) वारंवार हँग होत होते. पालक व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा अर्ज (Scholarship Application) भरण्यास अडथळे येत होते. त्यामुळे पुन्हा एकदा शिष्यवृत्ती भरण्याची मुदत १५ दिवस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही मुदत 28 जानेवारी पर्यंत होती. ती 14 फेब्रुवारी करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेकडे या कालावधीत 16 हजार 49 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 11 हजार 880 अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. अशी माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून देण्यात आली.
महापालिकेतर्फे इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये समाज विकास विभागातर्फे महापालिका हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ८० टक्के गुण मिळाल्यास १५ हजार व बारावी एवढेच गुण मिळाल्यास २५ हजार रुपायांची शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिकेच्या शाळांमधील व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही अट ६५ टक्क्यांची आहे.
कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर यंदा पदवीच्या प्रवेश प्रक्रिया लांबली आहे व आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी असलेल्या संकेतस्थळाचा तांत्रिक प्रश्न निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेले नव्हते. त्यामुळे २८ जानेवारी पर्यंतची मुदतवाढ दिली होती. मात्र नंतर वेबसाईट हँग झाल्याने पुन्हा ही मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यानुसार या कालावधीत महापालिकेकडे अर्जांचा पाऊस पडला आहे. महापालिकेकडे या कालावधीत 16 हजार 49 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद योजनेसाठी 7926 तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेसाठी 8123 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 11 हजार 880 अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने बिलांची प्रक्रिया देखील सुरु केली आहे. सुमारे 6752 बिले तयार झाली आहेत. असे समाज विकास विभागाकडून सांगण्यात आले.
COMMENTS