‘ॲमेनिटी’च्या विक्रीला दादा पाटलांची ‘स्पेस’  : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका   : भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान

HomeपुणेPMC

‘ॲमेनिटी’च्या विक्रीला दादा पाटलांची ‘स्पेस’ : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका : भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान

Ganesh Kumar Mule Sep 09, 2021 2:57 PM

77th Independence Day | PMC Pune | पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Dr. Kunal Khemnar : Hemant Rasane : Ideal Ward : स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांच्यावर सोपवली ‘ही’ जबाबदारी!
Metro | Smart City | SRA | गरवारे महाविद्यालय ते न्यायालय मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा |मेट्रो, स्मार्ट सिटी, एसआरएचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

‘ॲमेनिटी’च्या विक्रीला दादा पाटलांची ‘स्पेस’

: राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका

: भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान

पुणे : पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या मालकीच्या १८५ ॲमेनिटी स्पेस विक्रीला काढल्या असून, त्यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातील ७४ ॲमेनिटी स्पेसचा समावेश आहे.  महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांच्या होकाराशिवाय किंवा संमतीशिवाय महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी या ॲमेनिटी स्पेस ‘घावूक’ आणि ‘होलसेल’ दराने विक्रीला काढल्या असतील, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे, कोथरूडकरांच्या ॲमेनिटी स्पेसची विक्री करण्याचा गोरखधंदा सत्ताधारी भाजपने सुरू केला आहे, यात काही शंका नाही. या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.

: मनमानी कारभाराला राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमी विरोध

जगताप म्हणाले कि, कोल्हापुरातून पुण्यात येऊन कोथरूडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना कोथरूडकरांनी स्वीकारले. त्यांना आमदार म्हणून निवडून दिले. परंतु, त्यांचा कोथरूडकरांना काही फायदा होणे तर दूरच, उलट त्यांना निवडून देणे किती त्रासदायक ठरत आहे, हे ॲमेनिटी स्पेस विक्री प्रकरणातून दिसून येत आहे. भाजपने विक्रीस काढलेल्या १८५ पैकी ७४ ॲमेनिटी स्पेस या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील कोथरूड, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील आहेत. या ॲमेनिटी स्पेसची विक्री झाल्यानंतर कोथरूडकरांना आरक्षणाच्या जागाच शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे, चंद्रकांत पाटील हे ज्यांनी आपल्याला निवडून दिले, त्या भागातील मोकळ्या जागा म्हणजेच फुफ्फुसच विक्रीला काढल्याची भावना पुणेकर व्यक्त करीत आहेत.
जगताप पुढे म्हणाले कि, भाजपच्या या मनमानी कारभाराला राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या दिवसापासून विरोध केला असून, दिवसेंदिवस या प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. कोथरूड मतदारसंघातील बहुसंख्य नगरसेवकांनी आणि शहरातील भाजपच्या आणखी काही अशा जवळपास ३० नगरसेवकांनी नुकतीच गुप्त बैठक घेतली. त्यात असंतोषाचा भडका उडाला. त्यानंतर महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बंडाची कल्पना आल्यानंतर मंगळवारची महानगरपालिकेची मुख्य सभा तहकूब करण्यात आली. यावरून, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, हे लक्षात येईल. चंद्रकांत पाटील यांचे पुण्यात येणे, वावरणे आणि शहराच्या सौंदर्यावर घाला घालण्यासाठी हातभार लावणे किती धोकादायक आहे, हे आता सामान्य पुणेकरांना पटले असेल. ॲमेनिटी स्पेसच्या विक्री प्रकरणात चंद्रकांत पाटील हे लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य पुणेकरांच्या बाजूने आहेत की मनमानी कारभार करणाऱ्या त्यांच्या पक्षाच्याच बाजूने आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन मी करतो. असे ही जगताप म्हणाले.