स्मार्ट सिटी ला ४० कोटीचा निधी!
: स्थायी समिती ने दिली मान्यता
: अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती
पुणे: केंद्र व राज्य सरकारचा निधी प्राप्त झाला तरी गेल्या सहा महिन्यांपासून स्मार्ट सिटीला ४० कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव प्रलंबीत होता. आज अखेर यास स्थायी समितीने मान्यता दिली. तरीही अजून ३२ कोटी रुपये देण्यासाठी महापालिकेला निधी उपलब्ध करावा लागणार आहे. अशी माहिती स्थायी समिती चे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ची स्थापना करण्यात आली. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिका यांच्याकडून निधी दिला जातो. स्मार्ट सिटी योजनेची मुदत संपल्यानंतर अनेक प्रकल्प अर्धवट आहेत, त्यामुळे केंद्र सरकारने या योजनेला दोन वर्षाची मुदतवाढ दिली आहे.
स्मार्ट सिटीला केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा वेळेत मिळाला पण पुणे महापालिकेने हिस्सा थकविला होता. थकीत ७२ कोटी रुपयांची मागणी मार्च महिन्यात करण्यात आली होती. पण हा विषय स्थायी समितीमध्ये वारंवार पुढे जात होता. अखेर ४० कोटी रुपये देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, डिसेंबर २०२० ते जून २०२१ या कालावधीत महापालिकेने ‘स्मार्ट सिटी’ला काहीच निधी दिला नव्हता. या काळात केंद्राकडून ४९ कोटी रुपये आणि राज्य सरकारकडून २४ कोटी ५० लाख रुपये ‘स्मार्ट सिटी’ला देण्यात आले.
COMMENTS