स्मशानभूमीतील हवा प्रदूषण कमी करणार महापालिका
: महापालिका स्मशानभूमीत बसवणार हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा
: शहरातल्या 15 स्मशानभूमीत बसणार APC सिस्टीम
: 13 ठिकाणी बसवणार हायब्रीड दाहिनी
पुणे: वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेला केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे. यासोबतच संबंधित काम करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. यांत्रिक पद्धतीने रस्ता स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला केंद्राकडून दोन रस्ता सफाई यंत्र देण्यात आले आहेत. त्यानंतर आता महापालिका हवा प्रदूषण कमी करण्यासाठी स्मशानभूमीत हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा म्हणजे APC सिस्टीम बसवणार आहे. शिवाय हायब्रीड दाहिन्या देखील बसवल्या जाणार आहेत. अशी माहिती विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी दिली.
: केंद्राकडून निधी प्राप्त झाला आहे
15 व्या वित्त आयोगांतर्गत 217 कोटी रुपये पालिकेच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यासाठी दोन खाती तयार करण्यात आली आहेत. एक म्हणजे पर्यावरण आणि वायू प्रदूषण कमी करून शहराची हवेची गुणवत्ता सुधारणे. यासाठी महापालिकेला 134 कोटी मिळाले आहेत. तर दुसरा घनकचरा आणि पाणीपुरवठा योजनेशी संबंधित आहे, ज्यात ड्रेनेज देखील समाविष्ट आहे. या अंतर्गत महापालिकेला 83 कोटी मिळाले आहेत. असे 217 कोटी मिळाले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी एक समन्वय अधिकारी नेमण्यात आला आहे. केंद्र सरकारने सध्या वायू प्रदूषणाशी संबंधित निधी खर्च करणे सुरु केले आहे. त्यानुसार महापालिका ने देखील काम सुरु केले आहे. महापालिकेने याआधी रोड स्वीपर खरीदी केले आहेत. कचरा गोळा करण्यासाठी लागणारी वाहने खूप जुनी आहेत. त्याच्यासाठी नवीन वाहन आणण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी सुमारे 30 कोटी खर्च येईल.
: एका दाहिनीसाठी 60-65 लाखाचा येईल खर्च
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आता महापालिका शहरातील 15 स्मशानभूमीत हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा म्हणजे APC सिस्टीम बसवणार आहे. या यंत्रणेद्वारे धुरातील कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण कमी केले जाते. तर 13 ठिकाणी हायब्रीड म्हणजे विद्युत आणि गॅस दाहिन्या देखील बसवल्या जाणार आहेत. या दाहिनीसाठी प्रत्येकी 60-65 लाखाचा खर्च येईल. म्हणजे जवळपास 7 ते 8 कोटींचा खर्च येईल. लवकरच ही प्रक्रिया सुरु केली जाईल. अशी माहिती विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी दिली.
वायू प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेला केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार स्मशानभूमीत हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा म्हणजे APC सिस्टीम बसवणार आहे. शिवाय हायब्रीड दाहिन्या देखील बसवल्या जाणार आहेत.
COMMENTS