राज्यशासना कडून प्रतिनियुक्ती वर आलेल्या उप अभियंत्यास परत पाठवा
: पुणे महापालिका अभियंता संघाची आयुक्तांना मागणी
: काम बंद आंदोलनाचा इशारा
पुणे: राज्य सरकार कडील जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता वर्ग २ या पदावरील अभियंता संवर्गातील सेवकाला पुणे महानगरपालिकेमध्ये प्रतिनियुक्तीने पाठविण्यात आले आहे. त्यांना पुणे महापालिकेत सामावून घेण्यात आले आहे. मात्र या सर्व प्रकाराचा अभियंता संघानेतीव्र निषेध व्यक्त केला आहे. कारण पुणे महानगपालिका सेवा नियमावलीमध्ये उप अभियंता पदाच्या सेवकांना प्रतिनियुक्ती देणेची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे प्रतिनियुक्ती वर आलेल्या उप अभियंत्यास तातडीने परत पाठविण्यात यावे. अशी मागणी महापालिका अभियंता संघाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. असे नाही झाले तर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील अभियंता संघाने दिला आहे.
: प्रशासनाकडून सेवा नियमाचा भंग
याबाबत महापालिका संघाने आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार उप अभियंता श्रेणी २ असे कोणतेही पद पुणे महानगरपालिकेत अस्तित्वात नाही. हे पद पुणे महानगरपालिकेतील शाखा अभियंता या पदाशी समकक्ष असे आहे. यामुळे शाखा अभियंता पदावरील सेवकाला उप अभियंता पदावर प्रतिनियुक्ती देणे, हे सेवा नियमांचा भंग करणारे असे आहे. हे आम्ही आपल्या निदर्शनास आणीत आहोत. उप अभियंता पदासाठीची DPC होवून एक महिन्याचा कालावधी लोटला असून अद्यापपर्यंत त्यांच्या बढ़तीचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता ते शाखा अभियंता पदोन्नती सुद्धा एक महिना झाले तरी रखडली आहे. तसेच त्याव्यतिरिक्त अनेक अभियंते उप अभियंता पदासाठी पात्र आहेत. या सर्व अभियंत्यांची पुणे महानगरपालिके मध्ये किमान १५ ते २० वर्ष इतकी सेवा झाली आहे. मात्र जागा शिल्लक नाहीत आणि इतर कारणे सांगून प्रशासनाकडून बढती प्रक्रिया केली जात नाही. संघाच्या पत्रानुसार अशा पार्श्वभूमीवर शासनाकडील उप अभियंत्याला प्रतिनियुक्ती देणे योग्य नाही. या सर्व बाबींचा विचार करता हि प्रतिनियुक्ती पुणे महानगरपालिकेत अभियंत्यांवर अन्याय करणारी आणि त्यांचे न्याय्य हक्कास बाधा आणणारी आहे. यामुळे सर्व अभियंते नाराज झाले असून हक्का साठी प्रसंगी काम बंद आंदोलन करण्याच्या मनःस्थितीत आले आहेत. तरी राज्यशासना कडून प्रतिनियुक्ती वर आलेल्या उप अभियंत्यास तातडीने परत पाठविण्यात यावे. अशी मागणी संघाने केली आहे. अन्यथा बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देखील संघाने दिला आहे.
महानगरपालिकेत उप अभियंता पदाचे पात्र सेवक असताना त्यांना प्रमोशन न देता शासनाच्या प्रतिनियुक्तीवर अभियंता आणणे गैर आहे. उप अभियंता पदासाठी प्रति नियुक्ती साठी कोणतीही तरतूद नाही. या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सोमवारी कोरोना चे सर्व नियम पाळून हिरवळीवर जमणार आहोत. यातूनही प्रशासनाने त्यांना परत न पाठवल्यास बेमुदत संपाचा इशारा आम्ही देणार आहोत.
COMMENTS