कोविड योद्धा म्हणून शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली
: महापालिका शिक्षण विभागाच्या मिनाक्षी राऊत यांचे प्रतिपादन
: नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या वतीने शिक्षक गौरव समारंभ
पुणे: कोरोनामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये गेली १६-१७ महिने ताटातूट झाली आहे. अनेक शिक्षकांनी कोविड योद्धा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सर्व प्रकारची भूमिका पार पाडण्याची शिक्षकांची मनापासून तयारी असते. ह्या महामारीच्या काळात देखील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ऑनलाईन क्लास घेणे, असे अनेक कामे करतात. सर्वात जास्त त्याग व मेहनत करणारे व्यक्ती म्हणजे शिक्षकच असतो. असे मत पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी मिनाक्षी राऊत यांनी व्यक्त केले.
: शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती – चांदेरे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक ९, बाणेर- बालेवाडी – सुस – म्हाळुंगे यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिक्षक दिनानिमित्त ” शिक्षक गौरव समारंभ ” या कार्यक्रमाचे आयोजन बाणेर येथील बंटारा भवन याठिकाणी करण्यात आले होते. यावेळी मिनाक्षी राऊत बोलत होत्या. यावेळी नगरसेवक तथा शिक्षण समितीचे सदस्य बाबुराव चांदेरे यांनी सांगितले की शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती आणि संकटात धीर देणारी स्फूर्ती असते. शिक्षक करीत असलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या हातून या देशाची नवीन पिढी घडत असताना त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असणे फार आवश्यक आहे.
: 500 शिक्षकांचा गौरव
चांदेरे यांनी सांगितले की, सन २००६ पासून बाणेर – बालेवाडी मध्ये आम्ही हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत आहोत. परंतु यावर्षी सुस आणि माळुंगे या दोन्ही गावांचा पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झाल्यामुळे या भागातील माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींना प्रथमच आज शिक्षक दिनानिमित्त सन्मानित करताना मला फार आनंद होत आहे. सध्या कोविड सारख्या महामारीला सामोरे जात असताना शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र असा बदल घडून येताना दिसत आहे. पूर्वी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जो संवाद होत होता, तो आज ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे लोप पावत चालला आहे. असेही मत यावेळी चांदेरे यांनी व्यक्त केले . या कार्यक्रमात बाणेर – बालेवाडी- सुस- म्हाळुंगे या परिसरातील सुमारे ५०० शिक्षकांना गौरविण्यात आले. याप्रसंगी श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव बालवडकर, पुनम विधाते, डॉक्टर मीना विधाळे, अर्जुन शिंदे, अर्जुन ननावरे, विशाल विधाते, चेतन बालवडकर, मनोज बालवडकर, बालम सुतार, अजिंक्य निकाळजे, पांडुरंग पाडाळे, युवराज कोळेकर, सुषमा ताम्हाणे, वैशाली कलमानी, प्राची सिद्धकी आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक दिलीप फलटणकर सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक , पुणे महानगरपालिका शिक्षण समितीचे सदस्य बाबुराव चांदेरे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सागर बालवडकर तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका रूपाली बालवडकर आणि सूत्रसंचालन नितीन कळमकर यांनी केले.
COMMENTS