आम्ही कधी पाठिंबा दिलाच नाही; विरोध कायम
– राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची भूमिका
– अमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव लांबणीवर
पुणे. शहरातील ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव महापालिकेची मुख्य सभा तहकूब झाल्याने लांबणीवर पडला आहे. राष्ट्रवादीने या प्रस्तावाला मान्यता देण्याची भूमिका घेतली होती. नंतर ती बदलण्यात आली. मात्र शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उघडपणे सांगितले आहे की आमचा पहिल्यापासून या प्रस्तावाला विरोध होता आणि तो तसाच कायम राहणार आहे. मात्र शहर अध्यक्ष्यांच्या या भूमिकेमुळे मात्र पक्षातील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे.
– जाहीर केला होता पाठिंबा
राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुधवारी सायंकाळी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन ॲमेनिटी स्पेसचा आराखडा करणार आणि ३३ टक्के जागा अर्बन स्पेससाठी राखीव ठेवणार, या उपसूचनांच्या बदल्यात ठरावाला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अचानक भूमिका बदलल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही खदखद निर्माण झाली. हा सर्व प्रकार उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजित पवार यांच्यापर्यंत गेला. त्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसची महापालिकेत बैठक झाली. त्यात बहुसंख्य नगरसेवकांनी ठरावाला विरोध करण्याची भूमिका घेतली. त्यानुसार पक्षाने ठरावाला विरोध करण्याचे जाहीर केले.
– मुख्य सभा तहकूब
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज दुपारी तीन वाजता सुरू झाले. परंतु, कल्याणसिंह, डॉ. गेल ऑम्वेट, शरद महाजन यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा आणि स्वारगेट- कात्रज भुयारी मेट्रोला मंजूरी देण्याचा ठराव लांबणीवर पडला. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा भूमिका बदलल्यामुळे ठराव लांबणीवर पडला, अशी महापालिका वर्तुळात चर्चा आहे. भाजप मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून येणाऱ्या मुख्य सभेत हा प्रस्ताव मंजूर केला जाईल, असे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी सांगितले. तिकडे मनसे, शिवसेना व कांग्रेस ने आपला विरोध असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी!
मात्र या विषयाच्या निमित्ताने राष्ट्रवादी मधील गटबाजी उघड झाली आहे. सुरुवातीला खासदार वंदना चव्हाण यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. तर पक्षातील काही नगरसेवक या बाजूचे होते. त्यानंतर खासदारांनी आपला विरोध मवाळ केला. त्यानुसार भाजप सोबत बसून प्रस्तावाला उपसूचना कशा असाव्यात अशी चर्चा देखील राष्ट्रवादीने केली. मात्र पुन्हा काही नेत्यांनी विरोध सुरु केला. एकमत अखेरपर्यंत झाले नाही. खरे म्हणजे पक्षातील लोकांना अमेनिटी भाड्यावर द्यायला हरकत नाही. मात्र अंतर्गत गटबाजीमुळे विरोधाचा सूर लावावा लागत आहे. अखेर प्रस्तावाला विरोध जाहीर करावा लागला.
——
पक्षाचा पहिल्यापासून अमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्याच्या प्रस्तावाला विरोध होता. तो तसाच कायम राहणार आहे.
– प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस.
—
महत्वाच्या व्यक्तींच्या निधनामुळे ही सभा तहकूब करावी लागली. मात्र आम्ही पुढील सभेत हा प्रस्ताव मंजूर करून घेऊ. त्याबाबत आम्ही ठाम आहोत.
– गणेश बिडकर, सभागृह नेता, महापालिका.
COMMENTS