DCM Devendra Fadanvis Birthday | राष्ट्र प्रथम, मग पक्ष, शेवटी आपण…हाच देवेंद्रजींचा बाणा | अमोल बालवडकर

HomeपुणेPolitical

DCM Devendra Fadanvis Birthday | राष्ट्र प्रथम, मग पक्ष, शेवटी आपण…हाच देवेंद्रजींचा बाणा | अमोल बालवडकर

Ganesh Kumar Mule Jul 22, 2022 3:05 AM

Amol Balwadkar Vs Baburao Chandre : राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडीचा पाणी प्रश्न निर्माण केलाय  : अमोल बालवडकर यांचा गंभीर आरोप 
Balewadi : बालेवाडीतील प्रगतशील शेतकरी मगन शेठ बाजीराव बालवडकर यांचे निधन 
Mahalunge TP Scheme : प्रत्येक शेतकऱ्याला टीपी स्कीमचा निश्चितपणे फायदा होणार  : पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांचे प्रतिपादन

राष्ट्र प्रथम, मग पक्ष, शेवटी आपण…हाच देवेंद्रजींचा बाणा

| अमोल बालवडकर, नगरसेवक, भारतीय जनता पार्टी

आपण राहतो त्या परिसराचं, आपल्या शहराचं, आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं भलं करावं अशी सामाजिक ओढ असणारा मी एक कार्यकर्ता आहे. समाजकारण साधण्यासाठी लोकशाहीत राजकारण महत्वाचं असतं. म्हणून मी महापालिकेची निवडणूक लढवली. लोकांनी भरपूर प्रेम करत मला निवडून दिलं. माझ्या सारख्या तरूण कार्यकर्त्यांपुढं आदर्श आहेत आपले देवेंद्रजी फडणवीस. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे नगरसेवक बनले. पाच वर्षांनी नागपुरकरांनी त्यांना पुन्हा भरघोस मतांनी निवडून दिलं. या दुसऱ्या खेपेस तर अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी म्हणजे सन १९९७ मध्ये नागपुरचे महापौर बनले. महापालिकेचं कार्यक्षेत्र त्यांच्या झपाट्याला, कर्तुत्वाला अपुरं पडू लागल्यानं १९९९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर आजतागायत त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाही. विधानसभेच्या १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग पाच निवडणुका त्यांनी जिंकल्या. विरोधी पक्षात असताना देवेंद्रजींनी त्यांच्या अभ्यासूपणाच्या बळावर सत्ताधाऱ्यांना किती वेळा सळो की पळो करून सोडलं याची गणतीच नाही. देवेंद्रजी विधानसभेत प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिल्यानंतर दहा-दहा वर्षं मंत्री म्हणून काम केलेल्या ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा घाम फुटायचा. प्रत्यक्षात घेतलेल्या वकिलीच्या शिक्षणाचा सगळा उपयोग देवेंद्रजी जनतेची वकिली करण्यासाठी विधिमंडळात करतात. आमदारकीच्या चौथ्या खेपेस देवेंद्रजींना पक्षानं थेट मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. पूर्वपुण्याई, घराणेशाही, धनशक्ती या बळावर भारतीय जनता पक्षात काहीही मिळत नाही. वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना महाराष्ट्रासारख्या देशातल्या सर्वात प्रगत राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा मान मिळू शकला.

देवेंद्रजींचा आज वाढदिवस आहे. वयाचं अर्धशतक पूर्ण केलेल्या या आपल्या नेत्यानं सार्वजनिक जीवनातली तीस वर्षं पूर्ण करावीत ही फार मोठी गोष्ट आहे. विशेष म्हणजे महापालिकेपासून सुरु झालेली त्यांची वाटचाल आजवर अपराजित राहिलेली आहे. हेवा वाटण्यासारखा हा प्रवास आहे. या प्रवासात देवेंद्रजींची सगळ्यात मोठी कमाई कोणती असेल तर प्रचंड विश्वासार्हता होय. देवेंद्रजींनी एखादा मुद्दा उपस्थित केला, प्रश्न मांडला म्हणजे त्यात शंभर टक्के तथ्य असतेच हे त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतून दिसून आलं. व्यक्तिगत आरोप, निंदानालस्ती यांना त्यांनी कधीही स्थान दिलेलं नाही. परंतु, राष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या हिताच्या आड कोणी येत असेल तर त्याची हजेरी घ्यायला ते चुकत नाहीत. त्यांच्या नैतिकतेचा दरारा विरोधकांना असतो. सत्ताधारी म्हणून काम करत असतानाही त्यांनी महाराष्ट्रातील सर्व घटकांचा प्रतिनिधी म्हणून राज्य केलं. त्यामुळं प्रत्येक मराठी माणसाला देवेंद्रजींचं मुख्यमंत्रीपद आपलं वाटल. ‘जे बोलतो ते करतो,’ ही पारदर्शकता राज्यकर्ता फडणवीस यांनी दाखवली आहे. पुण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा धडाका यापूर्वी खचितच कोणी दाखवला असेल. यापुर्वीच्या राज्यकर्त्यांनी मेट्रोच्या पोकळ घोषणा करत वर्षानुवर्षे काढली. परंतु, पुणेकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढणारी, घरी किंवा ऑफिसमध्ये जलद वेळेत पोहोचवणारी आणि पुण्याची हवा शुद्ध ठेवणारी पुणे मेट्रो ही फडणवीसांच्याच काळात आली. देवेंद्रजींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा केल्याने आता तर काही भागात ती धावूसुद्धा लागली आहे. वाढत्या पुणेकरांची तहान भागवणाऱ्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचंही असंच आहे. विरोधकांनी चर्चेत वेळ घालवला. फडणवीसांनी ती योजना विक्रमी वेळेत पूर्णत्वास नेऊन दाखवली. या शिवाय पुरंदर विमानतळ, चांदणी चौकातील उड्डाणपूल, कात्रज-कोंढवा रस्ता, बाणेर-बालेवाडीला स्मार्ट करण्याचा विषय, समान पाणीपुरवठा योजना, माण- म्हाळुंगे हायटेक सिटी, माण- हिंजवडी- बाणेर- बालेवाडी- शिवाजीनगर मेट्रो व मुळा-मुठा नद्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसन अशा पुण्याला अत्याधुनिक करणाऱ्या कितीतरी योजना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरु झाल्या. महापालिका हद्दीत नव्यानं समाविष्ट २३ गावांचा निर्णय देवेंद्र फडणवीस असते तर केवळ राजकीय हेतु साठी झाला नसता , देवेंद्रजींनी भरघोस निधी या गावांना मनपा हद्दीत समाविष्ट करताना त्यांनी नक्कीच दिला असता .मात्र मधल्या काळात मराठी माणसांचा विश्वासघात करून मविआ सरकार सत्तेत आलं. मविआच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचारी आणि ढिसाळ कारभारामुळं पुण्याची प्रगती ठेचकाळली. मला पूर्ण विश्वास आहे की गतीमान कार्यकुशलता असणारे देवेंद्रजी आता पुन्हा सत्तेत आल्यानं या सर्व योजनांना वेग देतील. पुणेकरांचं जीवन सुखमय करतील.

शत्रुसुद्धा बोट दाखवणार नाही इतके निष्कलंक चारित्र्य देवेंद्रजींनी राजकारणाच्या बजबजपुरीत राहून जपलं आहे. स्वच्छ हात, सही दिशा, स्पष्ट निती ही देवेंद्रजींच्या राजकारणाची त्रिसूत्री आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिलेली राष्ट्र प्रथम, मग संघटना आणि शेवटी स्वतः ही शिकवण हाच देवेंद्रजींचा बाणा आहे. म्हणूनच सत्तेत सहभागी होणार नसल्याचे सांगून एकनाथजी शिंदे यांच्या मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकूट ठेवून देवेंद्रजी निर्लेपपणे बाजूला झाले होते. मात्र केवळ पक्षाचा आदेश म्हणून ज्या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषविलं त्याच ठिकाणी ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास तयार झाले. व्यक्तिगत अहंकार, इच्छा त्यांनी बाजूला ठेवली. पक्षाचा आदेश सर्वोच्च मानला. असा त्याग राजकारणात दुर्मिळ असतो. केवळ गुणवत्ता, प्रामाणिकपणा, जनतेप्रती असणारी बांधिलकी, निस्सिम राष्ट्रभक्ती आणि पक्षावरची अतूट निष्ठा या गुणांच्या बळावर राजकारणातली शिखरं कशी चढत जावीत, याचं उदाहरण म्हणून माझ्यासारखा तरुण कार्यकर्ता देवेंद्रजींकडं पाहतो. ‘क्या करेगा अकेला देवेंद्र’ असं म्हणून कधी कोणी खिजवण्याचा प्रयत्न केला. कधी जवळच्या नातेवाईंकावर हल्ला करून त्यांना डिवचलं गेलं. ‘मी पुन्हा येईन’, या राजकीय सभेतील वक्तव्यावरून देवेंद्रजींना कमी लेखलं गेलं. कधी ज्येष्ठ म्हणवणाऱ्या नेत्यांनी जातीवरून त्यांच्यावर हल्ले केले. मात्र यातल्या कशाबद्दलच सूडाची भावना न ठेवता देवेंद्रजींनी सर्वांना माफ केलं आणि शांतपणे काम करीत राहिले. पुरेसं संख्याबळ नसतानाही त्यांनी पक्षाला राज्यसभा आणि विधानसभेत अशक्यप्राय वाटणारं यश मिळवून दिलं. सुसंस्कृत, सज्जन तरूणांना राजकारणात भवितव्य असल्याची आशा देवेंद्रजींमुळे जिवंत राहिली आहे. राजकीय डावपेचात आणि बेरजेच्या राजकारणातही महारथी असणाऱ्या देवेंद्रजींनी भल्याभल्यांचे अंदाज धुळीस मिळवले. महाराष्ट्राचा हा लाडका चतुर, चतुरस्त्र नेता आज ना उद्या राष्ट्राच्या सेवेत महत्त्वाची भूमिका निभावणार आहे याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. महाराष्ट्राच्या या सुपूत्रास पुणेकरांच्यावतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना उदंड, निरामय आयुष्य देवो.

अमोल बालवडकर
भाजपा नगरसेवक पुणे मनपा
(२०१७-२०२२)