Shivajinagar Bus Station Pune | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू | माजी आमदार मोहन जोशी
Mohan Joshi Pune Congress – (The Karbhari News Service) – प्रवाशांची सोय आणि वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी येत्या १५ दिवसांत स्थलांतरित केले जावे, अन्यथा मुख्य मंत्र्यांची गाडी अडवू, असा इशारा माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिला आहे. (Shivajinagar Bus Station Pune)
शिवाजीनगर बसस्थानक लवकरात लवकर पूर्ववत सुरू व्हावे या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रोजी आंदोलन केले होते. त्यानंतर महामेट्रोच्या खर्चात छत्रपती शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतला. काँग्रेसच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला होता. या निर्णयालाही आता एक वर्ष होईल. परंतु, एसटी स्थानक पूर्वीच्याच जागी आणण्याबाबत काहीही हालचाल झालेली नाही. याकरिता परिवहन खाते सांभाळणाऱ्या मुख्य मंत्र्यांची गाडी अडविण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
महामेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे २०१९ मध्ये स्थलांतर करण्यात आले. पुणे- मुंबई महामार्गालगत स्थलांतर झाल्याने वर्दळीच्या रस्त्यावर एसटी वाहतुकीची भर पडली. स्थलांतर तात्पुरते असल्याने वाहतुकीची गैरसोय सहन केली. महामेट्रोचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे झाली, अद्याप शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत सुरू झालेले नाही, प्रवाशांना नाहक मनःस्ताप दिला जात आहे. यंदा तर, पावसाळ्यात स्थानकात आणि स्थानकाबाहेर पाण्याचे तळे साठले होते. त्यातून प्रवाशांना ये-जा करावी लागली. प्रवाशांची सहनशक्ती आता संपलेली आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
COMMENTS