Taljai Forest Park : तळजाई वन उद्यानात विविध विकासकामांचे उद्घाटन

Homeपुणेsocial

Taljai Forest Park : तळजाई वन उद्यानात विविध विकासकामांचे उद्घाटन

Ganesh Kumar Mule Feb 26, 2022 8:43 AM

DPDC | Ajit Pawar | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद | उपमुख्यमंत्री अजित पवार | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२३-२४ च्या खर्चास मान्यता
Hinjewadi IT Park Pune | पुण्याच्या हिंजवडी आयटी परिसरातील समस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
Pune Water Issue | 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याची पालकमंत्री यांच्याकडे मागणी

तळजाई वन उद्यानात विविध विकासकामांचे उद्घाटन

: वनक्षेत्राच्या अनुरूप विकासकामे करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे :- वनक्षेत्राचा विकास करताना निसर्गाला धक्का न लावता त्या  परिसराला अनुरूप विकासकामे करावीत आणि स्थानिक प्रजातीच्या वृक्षांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

तळजाई टेकडी येथील वन उद्यानातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भीमराव तापकीर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, माजी महापौर प्रशांत जगताप,  मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, उप वनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, नागरिकांना लाभ होईल आणि वन विषयक कायद्याचे पालन होईल अशा पद्धतीने विकास करण्यात यावा. या प्रक्रीयेत वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी, विविध सामाजिक संस्था, महानगरपालिकेलादेखील सहभागी करून घ्यावे. वनक्षेत्रातील स्वच्छता ठेवणे आणि येथील वन्यजीवांना सुरक्षित अधिवास मिळेल याची दक्षता घेणेदेखील गरजेचे आहे.

पर्यावरण रक्षणावर विशेष भर

कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजनचे महत्व अधोरेखित झाले. ऑक्सिजन प्रकल्पाची मोठ्या प्रमाणावर उभारणी करण्यात आली. माणसाच्या आरोग्याच्यादृष्टीने कायमस्वरुपी ऑक्सिजन देणारी झाडे जगविणे महत्वाचे आहे. शासनाने वनक्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे. वनक्षेत्र वाढविण्यासाठी आणि प्रदूषण कमी करून आरोग्यदायी पर्यावरण निर्मितीसाठी आवश्यक निधीदेखील देण्यात येत आहे. वारसा वृक्ष संवर्धनाकडेदेखील विशेष लक्ष देण्यात येत आहे. या कार्यात अभिनेता सयाजी शिंदे यांचे सहकार्य मिळत आहे. तळजाई परिसरातील ग्लिरिसिडीया प्रजातीचे वृक्ष काढून टप्प्याटप्प्याने स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पक्षी आणि प्राण्यांनाही जगण्याचा हक्क

पवार म्हणाले, विकासाच्या प्रक्रीयेत वन्यजीवांचा अधिवासही टिकेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पक्षी आणि प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे. प्राण्यांची संख्या अलिकडच्या काळात कमी होत चालली आहे. पर्यावरण संतुलनासाठी प्राणी, पक्षी वाचावेत यासाठी वन विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. प्राण्यांच्या अनाथालयासाठी २२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तळजाई वन उद्यानासाठी ५ कोटीचा निधी देण्यात आला आहे.

वन संवर्धनासाठी नागरिकांनी सूचना कराव्यात

पर्यावरण रक्षण आणि वन संवर्धनाच्या कार्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. वन विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत असले तरी नागरिकांनी उपयुक्त सूचना केल्यास त्याचाही विचार करण्यात येईल. हा समृद्ध नैसर्गिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि बहरलेला निसर्ग ही पुण्याची ओळख व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले. पर्यावरण रक्षणासाठी ई-वाहनांचा उपयोग वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी भरणे म्हणाले, तळजाई उद्यानाच्या माध्यमातून नागरिकांना चांगले पर्यावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. येथे आवश्यक सुविधा निर्माण करताना नैसर्गिक संपदेचेही जतन करण्यात येईल. परिसराचा विकास झाल्याने नागरिकांना सुविधा होईल.

निसर्गाचा आंनद देणारे वन उद्यान

पाचगाव पर्वती येथील भांबुर्डा वनपरिक्षेत्रातील एकूण २४७ हेक्टर क्षेत्र राखीव वन म्हणून १८८९ मध्ये अधिसूचित झाले आहे. या परिसरात वन उद्यान विकसीत करण्यासाठी १३ कोटींचा निसर्ग पर्यटन आराखडा मंजूर झाला आहे. तळजाई वन उद्यानामध्ये बांबू वनउद्यान, फुलपाखरू वन उद्यान, स्पर्श वन, सुगंधी वन, औषधी वनउद्यान,  जैवविविधता वन उद्यान,  पक्षी निरीक्षण पथ , निसर्ग प्रेक्षागृह, योगासनाकरता योग केंद्र, ध्यान केंद्र अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक सुविधा करण्यात आल्या आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाचे क्षण घालविण्यासाठी या सुविधा उपयुक्त ठरणार आहेत. उद्यानाला भेट देणाऱ्या नागरिक आणि मुलांसाठी निसर्ग परिचय केंद्रही उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पर्यावरणप्रेमी नागरीक उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0