पुणे महापालिकेत स्व. डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या तैलचित्राचे अनावरण
: विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांची संकल्पना
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत ज्येष्ठ समाजसुधारक व सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष स्व. डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी तटकरे म्हणाले, महापुरुषांच्या बाबत वारंवार चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. हेच जर सतत होणार असेल तर महापुरुषांच्या बाबत आता वेगळी कार्यप्रणाली तयार करण्याची आवश्यकता आहे.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे कार्याध्यक्ष सुरेश कासार, माजी नगरसेवक बाबा धुमाळ आदी उपस्थित होते.
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता तटकरे म्हणाले. महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरू या राजमाता जिजाऊ होत्या. इतरांचा त्यांच्याशी संबंध जोडणे चुकीचे आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी रामदास स्वामी यांचा संबंध जोडणे निषेधात्मकच आहे. याचा राज्यातील तमाम शिवप्रेमींकडून निषेध केला जात आहे. यापुढेही तो केला जाणार आहे. मात्र, आता हे वारंवार घडत आहे. याचा कोठेतरी विचार करण्यासाठी वेगळी कार्यप्रणाली तयार करण्याची गरज आहे. तरच अशा प्रकारे चुकीचे वक्तव्य करणे बंद होणार आहे.
COMMENTS