अनंतराव पवार महाविद्यालयाकडून गणेशमूर्तींचे संकलन
: महाविद्यालय प्रशासनाची माहिती
पुणे: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतरावराव पवार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने श्रीगणेशमूर्तींचे संकलन करून पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला.
: राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबवला उपक्रम
याप्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदिप कदम, खजिनदार अॅड. मोहन देशमुख, प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी, उपप्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, डॉ. प्रविण चोळके, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी आदी उपस्थित होते. दरवर्षी आपण गणेशोत्सव साजरा करतो श्रीगणेशाची आपण सर्वजण मनोभावे पूजा करतो. त्याप्रमाणे आपणाकडून एक प्रकारे पर्यावरणाचीही पूजा होणे अपेक्षित आहे. कारण श्री गणेश चतुर्थीला आपण श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा अत्यंत मनोभावे करतो आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश मूर्ती आणि निर्माल्य पाण्यामध्ये विसर्जित करतो. यामुळे जल प्रदूषण घडून येते. श्री गणेशाची पीओपीने बनवलेली मूर्ती, तसेच मूर्तीच्या आकर्षकतेसाठी केलेले रंगकाम हे जलप्रदूषणाचे प्रमुख कारण सांगता येते. मूर्तीसाठी बनविलेले रंग हे विविध रासायनिक प्रक्रिया करून तयार केले जातात. या रंगातील रासायनिक घटक पाण्यामध्ये मिसळल्याने पाणी पिण्यायोग्य तसेच शेतीयोग्य राहत नाही. या पाण्याचा आपण दैनंदिन वापर करतो. या प्रदूषित पाण्याचा वापर झाल्यामुळे आपणास विविध आजारांना सामोरे जावे लागते. तसेच यामुळे पर्यावरणाची हानी होताना दिसते. या निमित्ताने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने श्री गणेश मूर्ती संकलन हा पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला.
: निसर्ग संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी
यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अॅड. संदिप कदम म्हणाले की, जल, जंगल आणि जमीन यांचे प्रदूषणापासून संवर्धन करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून देशाच्या सेवेसाठी उत्तम असे स्वयंसेवक घडविले जातात ते आपले योगदान मानव आणि निसर्ग यांच्या जतन आणि संवर्धनासाठी देत आहेत. प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी म्हणाल्या की, श्री गणेशोत्सव साजरा करण्याचा आपण जसा आनंद घेतो, तशा प्रकारचा आनंद आपण पर्यावरणाचे रक्षण करून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या आनंदासाठी आपणाकडून पर्यावरणास हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. दिनांक 14, 18, 19 सप्टेंबर 2021 या तीन दिवशी महाविद्यालयाकडून श्री गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. यावेळी मूर्ती विसर्जनासाठी आणलेल्या भक्तांना जल प्रदूषणाची कारणे आणि परिणाम सांगून जल प्रदूषण होऊ नये यासाठी आपण कोणकोणते प्रयत्न करावेत याविषयी प्रबोधन करण्यात आले. संकलन केलेल्या श्रींच्या मूर्तींचे अमोनिअम बायकार्बोनेटच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने विघटन करण्यात आले. तसेच संकलन केलेले निर्माल्य गांडूळ खत निर्मितीसाठी उपयोगात आणण्यात आले. श्री गणेश मूर्ती संकलनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
COMMENTS