अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” विविध उपक्रमांनी साजरा
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर ता- जुन्नर जि-पुणे येथे मराठी विभागाच्या वतीने “मराठी भाषा गौरव दिन” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये “भाषा स्वाक्षरी मोहीम” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत पहिल्याच दिवशी 158 विद्यार्थी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
यावेळी सुप्रसिद्ध लेखक, कवी व गझलकार प्रा.जयसिंग गाडेकर यांचे “मराठी भाषेचे संवर्धन” या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन झाले. ते आपल्या व्याख्यानात म्हणाले “मराठी भाषेतील ज्ञानाचे भांडार आजच्या विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे. आपल्या भाषेतील ज्ञानाचा ठेवा दुसऱ्या भाषेत अनुवादित केला पाहिजे व दुसऱ्या भाषेतील ज्ञान आपल्या भाषेत आणले पाहिजे. अनेक विषयांवरील कोशनिर्मिती आपण केली पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील शब्दांना आपण पारिभाषिक संज्ञा तयार केल्या पाहिजेत. मराठी भाषेत ज्ञानरूपी अमृताचा कुंभ भरलेला आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्ञानाचा ठेवा कसा जाईल याविषयी आपण काम केले पाहिजे. आजच्या काळातील तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा जास्तीत जास्त जगभर पोहोचविण्याचा आपण संकल्प केला पाहिजे. मराठी भाषेतील ज्ञानाचे भांडार जगभर पोहोचविण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली पाहिजे. दुसऱ्या भाषेतील दर्जेदार साहित्याचा अनुवाद मराठी भाषेमध्ये केला गेला पाहिजे. असे ही गाडेकर म्हणाले.
मराठी भाषा ही ज्ञानभाषा : डॉ वसंत गावडे
प्रा डॉ वसंत गावडे आपल्या प्रास्ताविकपर भाषणात म्हणाले, मराठी भाषेला जगामध्ये एक महत्त्वपूर्ण दर्जा आहे. मराठीच्या बोलींनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा अधिकाधिक सकस, समृद्ध व सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे आहे . मातृभाषा हे संस्काराचे विद्यापीठ आहे. आपले जीवन समृद्ध करण्यात भाषेचे स्थान हे महत्त्वपूर्ण आहे. मराठी भाषा ही अभिजात आणि माझ्या मते मराठी भाषा ही ज्ञानभाषा आहे. तिच्यावर कोणीही तज्ञ किंवा विचारवंत यांना शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही. आपण प्रत्येकाने म्हटले पाहिजे माझ्या मराठी भाषेला अभिजात व ज्ञानभाषेचा दर्जा आहेच.”
अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ .एस. एफ.ढाकणे म्हणाले, “मराठी भाषेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलेली अनेक उदाहरणे आहेत. त्या थोर व्यक्तिमत्त्वांनी इंग्रजी भाषेचा आग्रह कधीही धरला नाही. आपल्या यशामध्ये मराठी माध्यम कधीही आड आले नाही. यशस्वी होण्यामध्ये मातृभाषेचा आणि मराठी भाषेच्या माध्यमाचा कोणत्याही प्रकारे अडसर येत नाही. आपल्याला आपली भाषा गौरवास्पद असावी असे मला वाटते.”
भाषा गौरव दिना निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमासाठी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुनील लंगडे, डॉ.भूषण वायकर, डॉ.रमेश काशीदे, डॉ. नंदकिशोर उगले, प्रा जनार्दन नाडेकर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एम. शिंदे व उपप्राचार्य डॉ.के .डी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम करण्यात आला.डॉ. छाया तांबे यांनी आभार मानले. प्रा.रोहिणी मदने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
COMMENTS