अमेनिटी स्पेस चा प्रस्ताव उद्या मुख्य सभेत चर्चेसाठी आणला जाणार नाही
: महापौर मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण
पुणे: अमेनिटी स्पेस दीर्घकाळासाठी भाड्याने देण्याच्या निर्णय सर्व नागरिक व लोकप्रतिनिधींना विचारूनच घेतला जाईल, यावर आम्ही ठाम आहोत, असे स्पष्टीकरण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. तसेच बुधवारी होणार्या सर्वसाधारण सभेमध्ये यासंदर्भातील प्रस्ताव चर्चेसाठी आणला जाणार नाही असे पत्रकार परिषदेत महापौरांनी स्पष्ट केले. ऍमेनिटी स्पेस भाड्याने देण्यावरून मागील दोन महिने गदारोळ सुरू असताना महापौरांनी प्रथमच ‘भुमिका’ मांडल्याने सत्ताधारी भाजपमध्ये आलबेल नाही, यावर यानिमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे. कारण आतापर्यंत सभागृह नेते यांनी या विषयावर सातत्याने भूमिका मांडली होती. शिवाय या पत्रकार परिषदेत सभागृह नेते देखील उपस्थित नव्हते. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते.
: स्थायी समिती ने मंजूर केला आहे प्रस्ताव
पत्रकार परिषदेत महापौर मोहोळ म्हणाले, की अमेनिटी स्पेस संदर्भात गेले काही दिवस चर्चा आहे. हा प्रस्ताव स्थायी मध्ये मंजूर झाला असून उद्या सर्वसाधारण सभेत निर्णय होणार आहे. पालिकेच्या ताब्यात ८५६ अमेनिटी आहेत. ५८६ वर वापर सुरू आहे. शिल्लक आहेत त्या १८५ आणि ८५ आरक्षित ऍमेनिटी स्पेस आहेत. मनपाचे उत्पन्न वाढवणे व तो निधी पालिकेच्या प्रकल्पांसाठी वापरणे एवढाच आहे. अमेनिटी स्पेसला विकसित करायला दीर्घ काळ जातो.अनेक अडचण येतात. आर्थिक तरतूद उपल्बध होत नाही. त्यामुळे वेळ लागतो. स्पेस विकसित झाल्यास देखभाल दुरुस्ती , व्यवस्थापन करायला खूप आर्थिक तरतूद करावी लागते. ही वास्तू भाड्याने द्यायची झाल्यास त्याला रेडिरेकनर नुसार भाडे द्यावे लागते.
महापौर म्हणाले या अमेनिटी ३० वर्षे भाडे कराराने दिल्यास सुमारे १७०० कोटी रुपये आणि ९० वर्षे कराराने दिल्यास ५ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. यातून दीर्घकालीन विकास होईल. मोठे प्रकल्प होतील. या जागांवर प्ले ग्राउंड, हॉस्पिटल्स, पार्किंग , हेल्थ क्लब, नर्सिंग होम, ओटा मार्केट यासारख्या नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. आम्ही पारदर्शी पद्ध्तीने विषय ठेवला आहे. त्यामुळे याबद्दलचे राजकारण थांबवावे. कुठलीही शंका ठेवून आम्हाला हा विषय करायचा नाही. यासाठीच वेळ घेऊन हा निर्णय केला जाईल. आम्ही पालिकेच्या हिताचाच निर्णय घेऊ.
आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन हा विषय घेणार आहोत. आम्ही विषयावर ठाम आहोत.
: महापौर आताच का समोर आले?
दरम्यान, दोन महिन्यांपुर्वी स्थायी समितीमध्ये एका दिवसांत कुठल्याही चर्चेशिवाय प्रस्ताव मंजुर केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांसोबत चर्चा करून भाजपचे गटनेते व सभागृह नेते यांनी प्रस्तावामध्ये काही उपसूचनांचा समावेश तसेच जागा वापराचा आराखडा तयार करण्याचे आश्वासित केले होते. परंतू प्रत्यक्षात ऑगस्ट महिन्यांची सर्वसाधारण सभा होण्यापुर्वी चर्चेनुसार उपसूचनांचा समावेश न केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रस्तावाला विरोध दर्शविला. त्यामुळे भाजपने त्यांच्या सदस्यांना व्हिप बजावूनही २२ ऑगस्टची सभा तहकुब केली. यानंतर ऍमेनिटी स्पेस भाड्याने देण्यावरून भाजपमधील नगरसेवकांच्या एका गटाने विरोधाची भुमिका घेतली. यामुळे ८ सप्टेंबरची सभाही तहकुब केली गेली. त्याचवेळी ऍमेनिटीच्या प्रस्तावावरून भाजप बॅकफूटला गेल्याचे स्पष्ट झाले. विशेष असे की या दोन महिन्यांमध्ये या प्रस्तावावरून झालेली चर्चा आणि अन्य पक्षांसोबतच्या वाटाघाटींमध्ये महापौर मुरलीधर मोहोळ हे कुठेच नव्हते. मात्र, ज्यावेळी बुधवारी सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव असलेली कार्यपत्रिका मांडली जाणार हे लक्षात आल्यानंतर महापौर मोहोळ यांनी सभेचे प्रमुख या नात्याने ऍमेनिटी स्पेसवरील भुमिका स्पष्ट केल्याने भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
COMMENTS