Aashadi Wari 2025 | एक दिवस वारीत घेतली संतविचारांची अनुभूती – कार्यकर्ते, मान्यवर वारीत सहभागी
Palkhi Sohala 2025 – (The Karbhari News Service) – ‘ ज्ञानोबा माऊली तुकाराम’ चा गजर करत वारीतील आपुलकी, प्रेम, मानवता, समता, बंधुता या मूल्यांची अनुभूती एक दिवस वारीतील कार्यकर्ते, मान्यवर यांनी घेतली. संविधानातील मूल्ये आणि संत विचारातील परस्परपूरकता अनुभवल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
वारीचा अनुभव घेण्यासाठी गेली १२ वर्षांपासून ‘ एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम आयोजित केला जातो. यंदाही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यवत ते वरवंड दरम्यान एक दिवस वारी हा उपक्रम झाला.
भांडगाव येथे दत्ता बोरकर यांच्या निवासस्थानी विश्रांती आणि संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी यावेळी भेट दिली. तसेच चव्हाण या एक दिवस वारीत ही चालल्या. कार्यक्रमात अजात संप्रदायाचे गणपती महाराज यांच्या डॉ. बाळ पदवाड लिखित चरित्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संत तुकडोजी महाराजांचे वारसदार सुबोधदादा महाराज, एक दिवस वारीचे संयोजक अविनाश पाटील, विशाल विमल, संविधान समता दिंडीचे संयोजक हभप शामसुंदर सोन्नर, हभप हरिदास तम्मेवार, भारत घोगरे गुरुजी, हभप समाधान देशमुख, दत्ता पाकिरे, महादेव पाटील, माया वाकोडे, मुकूंद काळे, सुरेंद्र माणिक आदी उपस्थित होते. बाबा नदाफ, सदाशिव मगदूम आणि सहकाऱ्यांनी अभंग, भजने सादर केली.
संत विचारानुसार गरीब श्रीमंत, लहान मोठा, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न पाळता सगळे वारकरी हे एकमेकांच्या पाया पडतात. आदर करतात. कोणताही भेदभाव करू नये, हेच मूल्य भारतीय संविधानात देखील सांगितले जाते. याचा प्रत्यय वारीत आला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दिवसभर चालणे, उन्ह पावसाची तमा न बाळगता पुढे पुढे जाणे, कोणताही बडेजाव न करता तल्लीन होऊन वारीत समरस होणे या गुणांचे दर्शन वारीत झाले.
राज्याच्या विविध भागातील सामाजिक संस्था, संघटनाचे कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, साहित्यिक, भारतीय भक्तिपरंपरेतील विविध पंथ, संप्रदायाच्या प्रतिनिधींसह पुणे मुंबईसह वर्धा, अमरावती, नाशिक, सांगली, संभाजीनगर, अहिल्यानगर, लातूर, सिंधुदुर्ग, सातारा, ठाणे, कोल्हापूर आदी ठिकाणाहून ४०० जण वारीत सहभागी झाले होते. दीपक देवरे, नागेश जाधव, सिद्धेश सूर्यवंशी, महादेव कोटे, नरेंद्र डुंबरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
COMMENTS