राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णासह सात पदके
: श्रद्धा चोपडेची भारतीय ज्यूदो संघात निवड
पुणे: चंदिगड येथे आयोजित राष्ट्रीय कॅडेट गटाच्या ज्यूदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि 3 कांस्य पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले. कोरोना पश्चात पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ज्यूदो खेळाडूंचा अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून खेळाडूंची संख्या सरासरी इतकी होती.
मुळची औरंगाबाद-वाळूज येथील पण सध्या खेलो इंडिया बालेवाडी पुणे येथील प्रकल्पात निवड झालेल्या श्रद्धा चोपडेनी 44 किलोखालील गटात सुवर्णपदक प्राप्त केल्याने तिची भारतीय संघात निवड झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटास लेबनॉन येथे आयोजित ओशियाना कॅडेट आंतरराष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत ती सहभाग घेईल.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ठाण्याची शायना देशपांडे (57 किलोखाली), पुण्याची गौतमी कांचन (63 किलोखाली) आणि क्रीडा प्रबोधिंनीच्याच समीक्षा शेलारने 70 किलोखाली गटात रौप्य पदक मिळवून दुसरे स्थान पटकावले.
नाशिकचा ईशान सोनवणे (66 किलोखाली), वर्धा हिंगणघाटची खेळाडू आणि नागपूर येथे सराव करणारी शिवानी कापसे (70 किलोवर) आणि पुण्याच्या आदित्य परबने 90 किलोवरील गटात कांस्य पदक पटकावले.
कॅडेट गटासह सबज्युनियर्स गटाच्याही राष्ट्रीय स्पर्धा याच ठिकाणी आजपासून आयोजिल्या असून महाराष्ट्राचा संघ यात सहभागी झालेला आहे. विजयी खेळाडुंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे जनरल सेक्रेटरी शैलेश टिळक आणि अध्यक्ष धनंजय भोंसले यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS