महापालिकेने तात्काळ बदलला आपला आदेश!
: ‘कारभारी’ च्या बातमीचा परिणाम
: कोरोनाचे नियम पाळण्याचे महापालिकेचे आवाहन
पुणे: शहरात महापालिकेने कोरोनाचे नियम ठरवून दिले आहेत. नियम न पाळल्यास दंड वसूल केला जातो. याच दंडाच्या माध्यमातून दररोज 10 लाख रुपये वसूल करण्याचा फतवा उपायुक्त माधव जगताप यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना काढला होता. याबाबत ‘कारभारी’ ने वृत्त प्रसारित केले होते. याचे पडसाद शहरभर उमटू लागले होते. नागरिक व व्यापारी वर्गातून याचा विरोध केला जाऊ लागला. त्यामुळे महापालिकेने आपल्या पहिल्या आदेशात बदल केला आहे. 10 लाखाचे उद्दिष्ट्य, नजरचुकीने लिहिले गेले होते, असे उपायुक्त माधव जगताप यांनी आदेशात म्हटले आहे. कोरोनाचे नियम न पाळल्यास कार्यवाही करावी, असे नवीन आदेशात म्हटले आहे.
– काय होता जुना आदेश?
याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी एक आदेश सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जारी केला होता. त्यानुसार मास्क न घालणे, सोशल डिस्टंसिन्ग न ठेवली तर कारवाई कडक करण्यास सांगितले गेले होते. शिवाय यातून दररोज 10 लाख रुपये वसूल करण्यास सांगितले होते. याबाबतचा दररोज अहवाल उपायुक्तांना द्यावा लागणार असून दररोजचे उद्दिष्ट्य पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र याचा सर्व स्तरातून विरोध होऊ लागला. व्यापारी वर्ग देखील आक्रमक झालेला दिसला. त्यामुळे महापालिकेने आपल्या आदेशात बदल केला आहे व नवीन आदेश जारी केला आहे.
– काय आहे नवीन आदेश?
महापालिकेने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार कोरोना प्रादुर्भाव वाढु नये याकरीता आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत. त्याचबरोबर सोशल डिस्टंसिंग व मास्क परिधान करणे याबाबत देखील नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात जागृती करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे सर्व संस्था, हॉटेल्स इत्यादींमध्ये नियम पाळणे आवश्यक आहे. याबाबत सर्व क्षेत्रिय कार्यालयांना संदर्भाकित पत्राने सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये रक्कम रूपये दहा लक्ष पर्यंत दंड आकारणी करण्यात यावी, असे नजरचुकीने नमूद करण्यात आले होते. त्याऐवजी नागरिकांमध्ये व व्यापारी संस्था या ठिकाणी मास्क परिधान न करणे व सोशल डिस्टंसिंग न ठेवणे याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. तरी सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.
COMMENTS